भरत गोगावलेंचे निकटवर्तीय शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात राजकीय समीकरणं पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. शिवसेनेचा प्रभाव क्षेत्र मानल्या जाणाऱ्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी थेट मंत्री भरत गोगावले यांच्या गटात मोठी घुसखोरी करत मोठा राजकीय डाव साधला. भरत गोगावले यांचे निकटवर्तीय आणि महाडमधील युवा उद्योजक सुशांत जाबरे यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. यावेळी मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. जाबरे हे मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात. त्यामुळे हा प्रवेश हा गोगावले यांच्या गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
सुशांत जाबरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रवेशामुळे महाडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांनी सांगितलं की, रायगड जिल्ह्यात युवा नेतृत्व तयार करणं हे आमचं ध्येय आहे. सुशांत जाबरे यांच्यासारख्या ऊर्जावान तरुणांच्या सहभागामुळं पक्ष अधिक मजबूत होईल. जाबरे यांचया राष्ट्रवादी प्रवेशामुळे पुढील काळात गोगावले यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच राजकीय आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.







