युती तुटली, आघाडी भक्कम
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाविष्ट झाला आहे. त्यामुळे तालुक्यात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भक्कम झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांची युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार की निवडणुका तिरंगी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
नवीन राजकीय समीकरणांमुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील गणिते बदलली आहेत. मात्र, त्याचवेळी कर्जत तालुक्यात महाविकास आघाडी भक्कम झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुधाकर घारे यांना अपक्ष म्हणून पडलेली मते आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना पडलेली मते यांची होणारी बेरीज लक्षात घेऊन तालुक्यात ही आघाडी मजबूत झाली आहे. कर्जत तालुक्यात शिवसेना ठाकरे पक्ष तसेच शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. या आघाडीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाला आहे. त्यात शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे चांगले समन्वय आहे. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आल्याने नवीन समीकरणे जुळली जाणार असताना महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष तिकीट वाटपात समाधानी होणार का? हा प्रश्न महाविकास आघाडी मधील जुने पक्ष यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. मात्र, ज्या पक्षाची ज्या जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणामध्ये ताकद आहे त्या पक्षांना सामावून घेण्याचे सूत्र ठरले असल्याचे बोलले जात आहे.
नवीन आघाडीमुळे तिकीट वाटपात नाराजी समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात देखील तिकीट वाटप वरून चढाओढ दिऊन येत आहे. भाजपकडून प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवसेना पक्ष भाजप कार्यकर्त्यांना किती झुकते माप देणार? याबाबत उत्सुकता आहे. त्यावर युतीमधील दोन्ही पक्षांची युती नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत कायम राहणार का? हे पाहायला लागेल. त्यामुळे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी कर्जत तालुक्याच्या राजकारणात पाहायला मिळणार आहेत.






