तलाठ्यांऐवजी तहसील कार्यालयात मिळणार उतारे
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका शेतीबहुल तालुका समजला जातो. या तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध असून, आता त्याच शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे सातबारा आणि फेरफार उतारे मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे. यापुढे पाच-सहा गावांचे मिळून बनलेल्या तलाठी कार्यालयात हे उतारे मिळणार नाही. मात्र, ते उतारे मिळविण्यासाठी काहीशे रुपये खर्च करून कर्जत येथील प्रशासकीय कार्यालयात पोहोचवावे लागणार आहे. दरम्यान, महसूल खात्याच्या या शेतकारी विरोधी कारभाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, शिवसेना ठाकरे पक्षाचे कृष्णा जाधव यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुका हा बहुतांशी ग्रामीण भाग आहे. तसेच कर्जत तालुक्यात शेतकरी वर्ग खूप मोठा आहे. कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो, कर्जतमध्ये मुख्यत्वे शेती हा व्यवसाय असून, शेतकऱ्याला आपल्या शेतीचे दस्तावेज हे जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये मिळत आहेत. परंतु, आता शेतकऱ्याला आपल्या शेतीचे फेरफार मिळवण्यासाठी थेट तालुक्याच्या गावाला जावे लागणार आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे फेरफार हे गावाजवळ असलेल्या तलाठी कार्यालयात मिळत होते. परंतु, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी अचानक मंडळ अधिकारी व तलाठी यांना तोंडी आदेश देत फेरफार दप्तर कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे बहुतांश फेरफार हे तहसील कार्यालयामध्ये जमादेखील करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आता चांगलीच तारांबळ उडणार आहे.
एक फेरफार काढण्यासाठी तालुक्याच्या गावाला जावे लागणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. शासन आपल्या दारी ही योजना कशासाठी राबवली? हादेखील प्रश्न येथे उपस्थित होत आहे. शेतकऱ्याला त्याच्या गावात तलाठी कार्यालयात फेरफार मिळत होते, आता त्याला तालुक्याला फेऱ्या मारावे लागणार आहेत. जर एखादा शेतकरी नांदगाव व खांडस या भागातून कर्जत तहसील कार्यालयात फेरफार काढण्यासाठी गेला असता त्याला जर का त्या दिवशी फेरफार मिळाला नाही, तर त्यांनी त्या फेरफारसाठी रोज फेऱ्या माराव्यात का? जाणीवपूर्वक शेतकऱ्याला त्रास होणारे उपक्रम शासनाकडून का राबवले जात आहेत. तलाठी कार्यालयातील जुने सातबारा व फेरफार तहसील कार्यालयात तात्काळ जमा करावेत, असा आदेश तहसीलदार यांना पारित झालेला आहे का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले असून, हा आदेश तहसीलदार कार्यालयाने ताबडतोब रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व देण्यात आलेले आदेश तसेच जमा केलेले दप्तर पुन्हा संबंधित तलाठी कार्यालयामध्ये पाठवावे, अशा आशयाचे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची नाराजी
आमच्या शेतीचे फेरफार तहसील कार्यालयामध्ये जाऊन घ्यावे लागणार असल्याने आमची खूप मोठी धावपळ आणि अडचण निर्माण झाली आहे. तलाठी कार्यालयात त्वरित फेरफार,सातबारा उपलब्ध होत होते व ते जलद गतीने देखील आम्हाला मिळत होते.परंतु आता एक फेरफार काढण्यासाठी पूर्ण दिवस लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्याची मोठी अडचण झाली आहे व त्यासाठी खर्च देखील होत आहे.







