पनवेल, कळंबोली, पळस्पे, खारघरमध्ये 70 जणांवर कारवाई
| पनवेल | वार्ताहर |
मद्यपान करून वाहन चालवणे हा मोठा गुन्हा आहे. जेव्हा एखादा वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवत असतो तेव्हा तो स्वतःसह त्याच्या वाहनात बसणारे प्रवासी, पादचारी आणि इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घालत असतो. रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. तसेच अशा अपघातांमध्ये होणार्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळेच रस्ते अपघात कमी करण्यासाठी मद्यपान करुन वाहन चालवू नये या उद्देशाने नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार 31 डिसेंबर निमित्त परिमंडळ 2 हद्दीत वाहतूक विभागाकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
यावेळी पनवेल, कळंबोली, पळस्पे, खारघरमध्ये छोटा पोलीस व बॉटल मॅस्कॉटच्या मदतीने वाहनचालकांना मद्यपान करुन वाहन चालवू नये याबाबत समाजप्रबोधन करण्यात आले. तसेच मद्यप्राशन करुन वाहन चालवल्यामुळे अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. तर अनेकजणांना कायमचे अपंगत्व देखील आले आहे. त्यामुळे मद्यप्राशन करुन वाहन चालवणे हे कायद्याच्या दृष्टीने गैर असण्यासोबतच स्वतःच्या जीवालाही धोकादायक असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. यावेळी वाहनचालक, नागरिक देखील या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल उड्डाणपूल सिग्नल, एचडीएफसी सर्कल, शिवशंभो नाका सिग्नल, वडाळे तलाव, पंचरत्न सर्कल, ठाणा नाका याठिकाणी 27, तसेच कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली सर्कल, कामोठे परिसर, रोडपाली सिग्नल येथे 22, यासह पळस्पे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पळस्पे फाटा, कोन फाटा याठिकाणी 10 आणि खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर थ्री मंकी पॉइंट, सायन-पनवेल महामार्ग आदि ठिकाणी नाकाबंदी लावून 10 याप्रमाणे 31 डिसेंबरनिमित्त संध्याकाळपासून ते सोमवारी (दि.1) सकाळपर्यंत ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 70 ड्राइव्हरवर कारवाई करण्यात आल्या.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ 2 कार्यक्षेत्रात 31 डिसेंबर व न्यु इयर सेलिब्रेशन शांततेत पार पडले. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते. यावेळी नागरिकांच्या मदतीसाठी देखील पोलीस दक्ष होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. रात्री अपरात्री वाहतुक कोंडीच्या समस्येत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप घरी पोहोचविण्यास पोलिसांनी मदत केली.
पंकज डहाणे,
पोलीस उपायुक्त