गाव, वाडी वस्त्यांवर पर्यावरण संवर्धनाचा जागर

ई-मॅमल प्रकल्प यशस्वी
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी आणि सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्या सहयोगाने रायगड जिल्ह्यातील एकमेव कुंडलिका विद्यालय पाटणुस शाळेत ई-मॅमल नावाचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. परिसरातील वन्यजीव, जैवविधता व पर्यावरण यांचा वेध घेऊन अभ्यास करण्याच्या उद्देशाने राबविलेला हा प्रकल्प फक्त शाळेपुरता मर्यादित न राहता गाव, वाडी वस्त्यांपर्यंत पोहचला असून पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी महत्वपूर्ण ठरला आहे.
हा प्रकल्प यशस्वीपणे राबविणारे शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले की, कोणत्याही दिनाचे औचित्य फक्त त्याच दिवसापुरते मर्यादित न ठेवता पूर्ण वर्षभर तो दिन व त्या पाठीमागील उद्देश साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न व त्यातून मिळालेले सकारात्मक परिणाम महत्वाचे असतात. पर्यावरण विषयक जनजागृती घडवण्याचे आणि पुढील पिढीपर्यंत पर्यावरणविषयी आवड निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम हे शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय या मार्फत केले गेले तर समाजात पर्यावरणविषयक बदल घडण्याचे काम आपोआप होईल. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम शालेय स्तरावर घडत असते. असाच पर्यावरण पूरक ई-मॅमल प्रकल्प कुंडलिका विद्यालय पाटणुस शाळेत यशस्वीपणे राबविला गेला आहे.
सह्याद्री पर्वत रांगेमधील या शाळेच्या आणि गावाच्या परिसरात कोण कोणते वन्यजीव वास्तव्य करतात याचा ट्रॅप कॅमेर्‍याद्वारे शोध घ्यायचा आणि त्या वन्यजीवांचा अभ्यास करायचा. या प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश होता. या प्रकल्पात काम करण्यासाठी शाळेतील 7 वी, 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे विविध गट करून प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मुळातच शाळेत 85 टक्के आदिवासी मुले असल्याने हा प्रकल्प राबवण्यासाठी कोणतेही अडथळे निर्माण झाले नाहीत. कारण जंगलातील ज्या भागात हे कॅमेरे लावले जायचे त्या भागाची सर्व माहिती या विद्यार्थ्यांना होती. प्रकल्पाच्या सुरुवातीला मुलांचा उत्साह फारच कमी प्रमाणात होता. परंतु सलग तीन वर्षे हा प्रकल्प राबवल्यामुळे हळूहळू मुलांचा उत्साह वाढत गेला.

गावागावांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती
ट्रॅप कॅमेर्‍यात कोणकोणते वन्यजीव कैद झाले हे विद्यार्थ्यांनी लॅपटॉप च्या आधारे बघून संबधित वन्यजीवांच्या जीवनशैली बद्दल पुस्तकांच्या आधारे अभ्यास करून शाळेतील इतर मुलांना, आपल्या शिक्षकांना, पालकांना व ग्रामस्थांना प्रकल्पाची आणि वन्यजीवांची माहिती दिली. त्यामुळे संबंधित प्रकल्प शाळेपुरता मर्यादित न राहता तो गावागावात पोहोचला आणि पाटणुस आणि अवतीभोवतीच्या गावामध्ये आदिवासी वाड्यांत पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण होण्याचे काम सोपे झाले.

संशोधनासाठी उपयोग
आतापर्यंत मागील वर्षभरात ट्रॅप कॅमेरे विद्यार्थ्यांद्वारे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये आलेले फोटो ई- मॅमल वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. ही एक प्रकारची शास्त्रीय माहिती आहे. ही सर्व माहिती संशोधनासाठी वापरली जाते त्यामुळे अनेक संशोधाकांचा बराच पैसा आणि वेळ वाचतो आहे.

Exit mobile version