| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड अभयारण्यातील कोंडगाव धरण परिसरात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग, रायगड यांच्या वतीने पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांतर्गत आत्मोन्नती विद्यालय, जांभूळपाडा येथील विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून विद्यार्थ्यांना निसर्ग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले. या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण सुधागडचे वनक्षेत्रपाल प्रशांत निकाळजे, वनपाल सुहास रणवरे, वनरक्षक राजेंद्र बेवनाळे, भास्कर पवार, अतुल अहिरे, पर्यवेक्षक विश्वास ढोपे तसेच वरिष्ठ शिक्षक वेत्रवान गुरव, सहायक शिक्षिका अंजना पिसे, मिलिंद शिंदे आणि शेखर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात सहभागी 50 विद्यार्थ्यांसाठी कॅप, जेवण आणि ये-जा करण्याची व्यवस्था सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आली होती. विद्यालयाचे प्राचार्य आणि पालकवर्गाने या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
शिबिरात भारतातील अग्रगण्य पर्यावरण व जैवविविधता संवर्धन संस्थेचे वन्यजीव अभ्यासक प्रशांत गोकर्णकर यांनी विद्यार्थ्यांना जंगलातील पक्ष्यांचे आवाज ओळखण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच हिंस्त्र प्राण्यांचे जीवनचक्र, अधिवास, अन्नसाखळी आणि पर्यावरणातील त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. जंगलात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचे प्रत्यक्ष दर्शन घडवून त्यांचे औषधी उपयोगही समजावून सांगण्यात आले. वर्गशिक्षक शेखर राऊत यांनी सांगितले की, मुलांच्या डोळ्यांत प्रश्न होते आणि त्या प्रश्नांतून निसर्ग समजून घेण्याची जिज्ञासा दिसत होती. हेच या शिबिराचे खरे यश आहे.
या निसर्ग शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव, निसर्गाविषयी आदर आणि जैवविविधतेच्या जतनाची भावना निर्माण झाली. निसर्गाशी सुसंवाद राखणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे भावी पिढी पर्यावरणाबाबत अधिक सजग होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.







