फुंडे विद्यालयात वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन

| चिरनेर | प्रतिनिधी |

देशातील प्रमुख बंदर असलेल्या न्हावाशेवा वाहतूक पोलिसांच्या वतीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या आधिपत्याखाली उरण तालुक्यातील फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन व वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणीही वाहन चालवू नये, अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लर्निंग लायसन्समध्ये कोणीही डबल सीट वाहन चालवणार नाही, अगर चालवल्यास लायसन्सधारक पाठीमागे बसलेला असावा, आपण किंवा आपले आई-वडील वाहन चालवीत असताना हेल्मेट घालण्याबाबत सूचना द्याव्या. तसेच चारचाकी असेल तर सीट बेल्ट लावण्याबाबत सूचना द्याव्या. सिग्नल जंप कोणीही करू नये, ट्रिपल सीट कोणीही जाणार नाही व राँग साईड वाहन चालवणार नाही, अशा प्रकारे वाहतुकीबाबत माहिती चित्रकलेच्या माध्यमातून देऊन प्रबोधन करण्यात आले. यावेळी प्रा.बी.बी. साळुंखे, येस. एम. बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version