| उरण | प्रतिनिधी |
न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात नुकताच रस्ते वाहतूक नियमन व सुरक्षा मार्गदर्शन घेण्यात आले. यामध्ये सुमारे 70 ते 80 विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक पोलिसांतर्फे किरण म्हात्रे, भांगरे, ढोके उपस्थित होते.
या प्रबोधनपर कार्यक्रमात वाहन चालविताना आपल्या घरातील पालकांनी हेल्मेटचा वापर करणे, दारू पिऊन गाडी न चालविणे वाहतुकीचे सर्व नियम पाळणे तसेच, रोडवर अपघात झाल्यास जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, 100 नंबर किंवा 112 नंबरवर फोन करून अपघाताची माहिती तात्काळ देण्यात यावी व जवळच्या वाहतूक चौकीला व पोलीस स्टेशनला कळविण्यात यावे तसेच 108, 1033 क्रमांकावर फोन करून ॲम्बुलन्स बोलवावी, अशा सुचना विद्यार्थ्यांना देऊन त्याद्वारे प्रबोधन करण्यात आले.
सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे आपण आपली वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन न्हावा शेवा वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता.







