प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक बळ; दहा हजारहून अधिक महिलांना धडे
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुळखानाव येथील अस्मिता वैभव भोईर यांनी स्वतः शिक्षण घेऊन परिसरातील हजारो महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. शिवणकला, ब्युटी पार्लर, केक, मेहंदी, रांगोळी अशा अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेऊन आज 10 हजारहून अधिक महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे.
अस्मिता भोईर यांनी शालेय शिक्षण पुर्ण झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहिले होते. स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी अस्मिता भोईर यांना बळ देण्याचे काम त्यांचे पती वैभव भोईर यांनी केले. त्यांनी स्वतः ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभा केला असून या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, कुटूंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनातून अस्मिता भोईर यांनी 2016 पासून स्वतः व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची सुरूवात केली. त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन इतरांनादेखील प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
गेल्या नऊ वर्षात अस्मिता भोईर यांनी जन शिक्षण संस्थान व इतर व्यावसायिक संस्थाच्या मार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून ग्रामीण भागातील महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, केक, मेहंदी, रांगोळी आदी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी 10 हजारहून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःदेखील एक चांगल्या व्यावसायिका बनल्या आहेत. व्यावसायिक प्रशिक्षणातून हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच, अनेक महिलांना उत्तम प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण होण्यास सक्षम बनविले आहे.
विविध पुरस्काराने सन्मानित
ग्रामीण भागातील अस्मिता भोईर यांनी अगदी कमी वयात व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल ग्रामपातळीपासून राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. त्यांना आहिल्याबाई ग्रामपंचायत पुरस्कार, वुमन ॲवॉर्ड व उमेद महिला समुहातर्फे व्यवसायिक ॲवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच, माजी राज्यपाल भगत सिंह कोशारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.







