| पेण | प्रतिनिधी |
सोबती संघटना पेण आणि भाऊसाहेब नेने महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून पेण शहरात जनजागृती रॅलीचे आयेाजन करण्यात आले होते.
सोबती संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने यांनी पेण प्रायव्हेट हायस्कूल येथून जनजागृती रॅलीला शुभेच्छा देऊन रॅलीची सुरूवात करून दिली. त्यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने, उपाध्यक्ष संजय कडू, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे प्रा.डॉ. सदानंद धारप यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक हजर होते. ही रॅली पेण प्रायव्हेट हायस्कूल येथून आंबेडकर चौक, चावडी नाका, हनुमान आळी, छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे पेण पोलीस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर पुन्हा पेण प्रायव्हेट हायस्कूल येथे येऊन रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये एड्स जनजागृतीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या हातात फलक देण्यात आले होते. त्याचप्रमाणे विद्यार्थी एड्ससंदर्भात माहिती असणारे पत्रदेखील नागरिकांना देऊन जनजागृती करत होते.