। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जतमध्ये माझी वसुंधरा अभियान 5.0 यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून, पर्यावरण संतुलनाबरोबर सामाजिक कार्य देखील नगरपरिषद प्रशासनाकडून होताना दिसत आहे.
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील रहदारीची ठिकाणे, वळण, रस्त्यालगतच्या मंदिरांच्या भिंती आदींवर घोषवाक्य लिहून आकर्षक रंगरंगोटीतून जनजागृती करण्यात येत आहे. भिंतीवरील हे घोषवाक्य नागरिकांचे लक्ष वेधत असून त्यानुसार येथील नागरिक त्याचे पालन करित आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून नवीन बांधकाम परवाना देताना पर्यावरण संतुलन तसेच गटार-पाणी याचे नियोजन, डासमुक्त परिसर, नवीन बांधकाम करताना ते पर्यावरण पुरक नियमांना बांधिल राहील, झाडे लावणे व ती जोपासना करणे याकडे नगरपरिषदेने लक्ष दिले आहे.
प्रशासनाचे प्रभावी काम
सध्या झाडांच्या बिया गोळा करून सीडबॉल तयार करण्यात येत आहेत. गाव, आदिवासी वाडी वस्ती येथील शाळांमधून मुलांच्या कौशल्य गुणांची पारख करून त्यांना मदत आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्या कला गुणांना वाव दिला जात आहे. त्यांच्याही माध्यमातून माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशव्या बंदी करण्यासाठी स्वच्छता कमिटी अथक परिश्रम घेऊन प्लास्टिक बंदी करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे नवीन झाडांची लागवड करण्यात आली आहे. या लावलेल्या झाडांची जोपासना करण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी ही झाडे दत्तक घेतली आहेत. तसेच भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंच महाभूते तत्वांच्या आधारे प्रशासन प्रभावी काम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
माझी वसुंधरा अभियान हे अभियान न राहता ते कायमस्वरुपी ठेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम केले जात आहे.
तानाजी चव्हाण,
मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद