सागरी सुरक्षा बळकटीसाठी सीआयएसएफचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफच्या मार्फत सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी या दलाने पुढाकार घेतला असून, बुधवारी सकाळी मांडवा येथे हे दल पोहचणार आहे. साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या दलामध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे.
सागरी किनारे सुरक्षीत व बळकट करणे. स्वातंत्र्य सैनिक व सुरक्षा दलांच्या बलिदानाचा आदर करणे. भारताच्या सागरी वारसाचा गौरव करणे. युवकांमध्ये फिटनेस आणि शिस्तीची भावना निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. यामध्ये 50 टक्के महिला सहभागी झाले आहेत. नऊ किनारी राज्ये व दोन केंद्र शासित प्रदेश असा एकूण साडेसहा हजार किलो मीटरचा प्रवास सायकलद्वारे केला जाणार आहे. या सायक्लॉथोनचा समारोप 22 फेब्रुवारीला होणार आहे. विकसीत भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टीकोनाला साकार करण्यासाठी सामुदायिक सक्षमीकरण, सतर्कता, व जबाबदार नागरिकत्वाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील बक्खाली व गुजराजमधील लखपत येथून सुरु झालेली ही चळवळ बुधवारी (दि.11) फेब्रुवारीला रायगड जिल्हयात दाखल होणार आहे. पश्चिम तट सायकलिंग टीम वसई विरार येथून मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया मार्गे रायगड जिल्हयातील मांडवा बंदर येथे साडेअकरा वाजता पोहचणार आहे. या प्रवास क्रमात सीआयएसएफ थळ युनीट पोहचणार आहे. थळ येथून पेझारी, व नागोठणे मार्गे, कोलाडकडे रवाना होणार असल्याची माहिती सीआयएसएफ पथकाकडून देण्यात आली आहे.






