मंडळ अधिकार्यांचे कारवाईकडे दुर्लक्ष
सरपंचाविरोधात शेकाप आक्रमक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आवासमधील सरपंचांच्या गैरव्यवहारांची यादी संपता संपतच नाही. आवास येथील पांडवादेवी खार येथील शासकीय सार्वजनिक जागेत सरपंच अभिजित आणि त्यांचे बंधू रणजित राणे यांच्यासह तब्बल दहा जणांनी अतिक्रमण केले आहे. मंडळ अधिकार्यांसमोर यासंदर्भात ग्रामस्थांनी आपले जबाब नोंदवूनदेखील यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खुद्द सरपंचच अतिक्रमण करीत असल्याने त्यांना अवैध ठरविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य महेंद्र कवळे यांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील आवास ग्रामपंचायतीमध्ये अनेक उद्योगपती तसेच धनाढ्य लोकांचे बंगले, रिसॉर्ट असल्याने आवास ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असतो. मात्र, काहीजण यातून आपला स्वार्थ साधून आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप महेंद्र कवळे यांनी केला आहे. आवास ग्रामपंचायत हद्दीतील पांडवादेवी खार येथील कालवीची विहीर ते तन्नावाडीपर्यंतचा गावनकाशावरील व पूर्वांपार वहिवाटीचा आवास समुद्रकिनार्यावरील रस्ता अडवून सरपंच अभिजित आणि त्यांचे बंधू रणजित राणे यांच्यासह तब्बल दहा जणांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत सारळ मंडळ अधिकारी यांच्यासमक्ष 3 जानेवारी 2022 रोजी लेखी स्वरुपात जबाब दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार अभिजीत आणि रणजित राणे नवीन गट नंबर 552/1 जुना गट नंबर 1356-1, सर्व्हे नंबर 385-7 पैकी, तसेच रेमु झवेरी नवीन गट नंबर 552/2 जुना गट नंबर 1356-3, सर्व्हे नंबर 385-7 पैकी, दिपक कल्याणजी तन्ना, समीर बांबोर्डेकर, निता तन्ना, बिंदू मेहता, अनिता देशमुख, जेरु लॉयर, मेहुल चौक्सी, आस्ताद पारख यांचा समावेश आहे. या जबाबासह जुना व पूर्वापारचा गाव नकाशावरील रस्ता नमूद/उल्लेखाबाबतची कागदपत्रेदेखील जोडण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व कागदपत्र असल्याने ही अनधिकृत बांधकामे त्वरित हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी महेंद्र कवळे यांनी केली आहे. तसेच सरपंच अभिजीत राणे यांनी स्वतः अतिक्रमण केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांचे पद अवैध ठरवून त्यांना सरपंचपदावरुन हटविण्याची मागणीदेखील त्यांनी केली असून, यासंदर्भात लढा देण्याचा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.







