रेवदंडा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील चोरढे या ग्रामीण गावात भरदुपारी, भरवस्तीत बाराच्या सुमारास गतिमंद मुलीस बंद घरात जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, रेवदंडा पोलिसांनी रोह्याकडे पळून जात असलेल्या नराधम आरोपीला त्वरित पाठलाग करून अटक केली आहे.
चोरढे येथे तेवीस वर्षीय गतिमंद मुलगी विधवा आईसह वास्तव्यास असून, दि. 7 जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी यांची पत्नी व ती गतिमंद मुलगी घराचे शेजारी असलेल्या स्लॅपवर वाळत घातलेल्या गव्हाची निगराणी करत होते. दरम्यान, आईसाठी पाणी आणण्यास पीडित मुलगी घरी गेली. या दरम्यान गावातील 42 वर्षीय हर्या उर्फ हरिश्चंद्र लक्ष्मण शेडगे यांनी तिला पाहिले व त्याचे घरासमोर बंद असलेल्या पुष्पा महादेव भोईर यांचे घराचे पाठीमागील दरवाजाने जबरदस्तीने आत नेऊन बलात्कार केला. पाणी आणण्याकरिता गेलेली गतिमंद मुलगी अद्याप का आली नाही म्हणून तिच्या आईने शोधाशोध केली असता, हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत गतिमंद मुलीच्या आईने रेवदंडा पोलिस ठाणे येथे थेट फिर्याद नोंदविल्यानुसार रेवदंडा पोलिसांनी तपास सुरू केला. घटना घडल्या ठिकाणी बोभाटा झाल्याने आरोपी हर्या उर्फ हरिश्चंद्र लक्ष्मण शेडगे तेथून फरार होऊन रोहा दिशेकडे पळून गेला. यावेळी घटनास्थळी दाखल झालेले रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. चिमडा, पो.ह. संतोष पवार, पोलीस हवालदार नितीन जगताप, पोलीस कॉस्टेबल राकेश मेहत्तर व पोलीस कॉस्टेबल सचिन वाघमारे यांनी त्यांची माहिती घेत पाठलाग सुरू केला. दरम्यान, रोहा तालुक्यात कोकबन येथील शेतातून पळत असलेल्या आरोपी हर्या शेडगेला रेवदंडा पोलिसांनी जेरबंद करून ताब्यात घेतले व अटक केली. रेवदंडा पोलीस ठाणे येथे आरोपी हर्या उर्फ हरिश्चंद्र लक्ष्मण शेडगे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक अशोक थोरात करीत आहेत.