| मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ 20 वर्षीय गतिमंद तरुणीवर अनेकांनी लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून, ही भयावह बाब तेव्हा समोर आली, जेव्हा तिच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं.
या प्रकरणात पोलिसांनी एका 37 वर्षीय इसमाला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. मात्र, आरोपींची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिसरातील 15 हून अधिक संशयितांचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेतले असून, ते कालिना येथील एफएसएल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डीएनए नमुने जुळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने आपल्या घरच्यांना पोटात काहीतरी वळवळतंय अशी तक्रार केली होती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. तपासणीत गर्भधारणा स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. मात्र, पीडिता गतिमंद असल्याने तिचा जबाब घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं.
यानंतर पोलिसांनी बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या एका सेवाभावी संस्थेची मदत घेतली. संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तरुणीशी संवाद साधण्यासाठी पाच वेगवेगळ्या सत्रांद्वारे तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. दीर्घ संवादानंतर तरुणीने काही व्यक्तींची नावे सांगितली. ज्या दोन व्यक्तींची नावे तिने स्पष्टपणे सांगितली, त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तर, ज्या व्यक्तींबाबत तिचे संकेत अस्पष्ट होते, त्यांच्या डीएनए नमुन्यांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सध्या सुरू असून, डीएनए अहवाल आल्यानंतर आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, पीडितेला न्याय मिळावा, यासाठी स्थानिकांकडून जोरदार मागणी केली जात आहे.







