जन्मदात्यांवर कुऱ्हाडीचे घाव

आई जागीच ठार, तर वडील गंभीर

| अकोला | वृत्तसंस्था |

आई-वडीलांना घरातील खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केले. कोरपना तालुक्यातील लोणी या गावात बुधवार (दि.21) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात आईचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृत आईचे नाव कमलाबाई पांडुरंग सातपुते (वय 70) असे आहे. वडीलांचे नाव पांडुरंग सातपुते (वय 78) आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मुलगा मनोज पांडुरंग सातपुते (वय 45) याला अटक केली.

पांडुरंग सातपुते यांच्याकडे वीस एकर शेती आहे. शेतीचे हिस्से करून उर्वरित शेती त्यांनी ठेक्याने दिली होती. काही दिवसांपूर्वीच पांडुरंग सातपुते यांना शेतीच्या ठेक्याचे पैसे मिळाले होते. ठेक्याचे पैसे मुलगा मनोज सातपुते याने वडिलांकडे मागितले होते. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात पैसे न दिल्याचा राग गेल्या काही दिवसांपासून होता. तेव्हा बुधवार (दि.21) आई आणि वडील दोघेही एकाच खोलीत बसल्याचे बघून तेथे मनोज शिरला. त्याने खोलीचे दार बंद केले. अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात आई जागीच ठार झाली. त्यानंतर त्याने पांडुरंग सातपुते यांच्या डोक्यावर वार केले. आई, वडील दोघेही खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यानंतर मनोजने तेथून पळ काढला.

मुलाने केलेल्या हल्ल्यात वडील पांडुरंग सातपुते गंभीर जखमी झाले. त्यांना कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संदीप एकडे, कोरपना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version