2 लाख 20 हजार झाडांवर कुर्‍हाड

नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची माहिती
। मुंबई । वृत्तसंस्था ।
अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करताना अडथळा ठरणार्‍या विविध प्रकारची दोन लाखांहून अधिक झाडे तोडण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 90 हजार झाडांचाही समावेश आहे. आतापर्यंत एक लाख झाडे तोडण्यात आल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली. सध्या गुजरातमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली असून तोडण्यात आलेली बहुतांश झाडे याच भागातील आहेत. तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात तेवढेच वृक्षारोपण करण्यात आल्याचा दावा कॉर्पोरेशनने केला आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडली जात आहेत. प्रकल्पाचे काम करण्यापूर्वी पर्यावरणावर होणार्‍या परिणामांचे सर्वेक्षण आणि त्याचा अहवाल तयार केला जातो आणि त्यानंतर शासनाच्या संबंधित विभागाकडून मंजुरी घेऊनच झाडे तोडण्यात येतात.
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीत सर्वेक्षणानुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करतानाही 2 लाख 20 हजार झाडे तोडावी लागणार असल्याचे सांगितले. यामध्ये 90 हजार झाडे महाराष्ट्रातील, 1 लाख 28 हजार 600 गुजरातमधील आणि 1 हजार 400 झाडे दादरा-नगर हवेलीतील आहेत. आतापर्यंत एक लाख 10 हजार झाडे तोडण्यात आली आहेत. दादरा-नगर हवेलीतील सर्व झाडे तोडली असून ठाणे जिल्ह्यातील 150 झाडांवरही कुर्‍हाड कोसळली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पात काही प्रमाणात विविध प्रकारची झाडे तोडावी लागणार असली, तरीही तेवढयाच प्रमाणात झाडे लावण्याचे कामही केले जाणार आहे. आतापर्यंत 76 हजार झाडे लावण्यात आली आहेत. तोडाव्या लागणार्‍या झाडांची संख्या कमीही होऊ शकते.
सुषमा गौर, प्रवक्ता, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

Exit mobile version