रायगड काँग्रेसतर्फे आझादी गौरव झेंडा पदयात्रा

| उरण | वार्ताहर |

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन 9 ते 15 ऑगस्टदरम्यान रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, जनतेने या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ.वर्षा गायकवाड यांनी उलवे नोड येथील पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी त्यांनी भाजप व केंद्र सरकारच्या चुकीच्या कार्य पद्धतीवर टीका केली.

महागाई,बेरोजगारी वाढली,सर्वसामान्य गरीब लोकांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. त्या विरोधात काँग्रेस पक्षाने आवाज उठविला. मात्र हा आवाज दाबण्यासाठी भाजपा व केंद्र सरकार सूड बुद्धीने शासकीय यंत्रणाचा गैर वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही अजिबात मागे हटणार नाही.समस्या विरोधात आवाज उठविण्याचा आमचा लोकशाहीचा हक्क आहे.

वर्षा गायकवाड, काँग्रेस नेत्या


महेंद्र घरत यांनी पदयात्रेची माहिती दिली. 9 ऑगस्टला नंदराज मुंगाजी व संजय ठाकूर यांच्या नेतृत्वात जासई येथील हुतात्म्यांना अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात होऊन, विनोद म्हात्रे व बाजीराव परदेशी यांच्या नेतृत्वात पागोटे येथील हुतात्म्यांना वंदन केले जाईल. तदनंतर, उरण तालुक्यातील चिरनेर येथे हुतात्म्यांना मानवंदना करून पुनाडपर्यंत पदयात्रा होईल. 10 ऑगस्ट रोजी नंदा म्हात्रे व अशोक मोकल यांच्या नेतृत्वात पेण तालुक्यातील विनोबा भावे यांच्या जन्मस्थळापासून गांधी मंदिर पेण पर्यंत पदयात्रा होईल. 12 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीस अभिवादन करून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व नाना जगताप, महाडच्या नागराध्या स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वात पदयात्रा किल्ले रायगड ते महाड शहरातील चवदार तळे याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात येणार आहे.

13 ऑगस्ट रोजी महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर आणि योगेश मगर यांच्या नेतृत्वात रेवदंडा नाका चोंढीमार्गे स्वातंत्र्यसैनिक स्तंभापर्यंत पदयात्रा काढण्यात येईल. 14 ऑगस्ट रोजी मिलिंद पाडगांवकर व शिवाजी खारीक यांच्या नेतृत्वात कर्जत तालुक्यातील नेरळ हुतात्मा चौकापासून मानवली कर्जत ते हुतात्मा स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती घरत यांनी दिली. या पद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महेंद्र घरत यांनी पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिकांना केला आहे.

यावेळी चारूलता टोकस, चंद्रकांत पाटील, श्रद्धा ठाकूर, नंदराज मुंगाजी, मिलिंद पाडगावकर, अकलाख शिलोत्री, राजाभाऊ ठाकूर, वैभव पाटील, नाना जगताप, धनंजय चाचड, रेखा घरत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version