बा .रायगड परिवारच्या ध्येयवेड्यांची अखंड सह्याद्री मोहीम

| पनवेल | वार्ताहार |

सहयाद्रीचे आकर्षण हे एखाद्या व्यसनासारखं आहे. एकदा का त्याची गोडी लागली की, ती मनातल्या मनात कायम घोळतच राहते. सह्याद्री हा एक अनादी, अनंत आणि अवीट असा मोह आहे ! स्वतंत्रपणे सह्याद्रीच्या दऱ्या-डोंगरांत टप्प्याटप्प्यांत भटकंती करणे वेगळं पण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून थेट तळकोकणात हद्दीपर्यंत सलग भटकायचं, वाटाड्या मिळाला तर ठीक, नाही तर ‌‘एकला चलो रे’ भटकंती सुरू ठेवायची, असं उदाहरण म्हणजे ट्रान्स सह्याद्री. 17 नोव्हेंबर 2023 रोजी किल्ले साल्हेर येथून सुरू केलेली ही मोहीम 16 डिसेंबर 2023 रोजी किल्ले पारगडला सुखरूपपणे पोहचली.

संतोष श्रीपती आलम, चेतन चंद्रकांत चव्हाण आणि संदीप यशवंत धोदरे यांनी पूर्ण साल्हेर ते पारगड हे जवळपास 950 किमीचे अंतर पार केले. तसेच चौथे साथीदार संदीप चंद्रकांत चौगुले यांनी किल्ले रायगडपर्यंत ही मोहीम पूर्ण केली. या सर्व प्रवासात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील लोकांचे प्रेम आणि माणुसकीचे अलौकिक दर्शन घडून आले. मुक्कामाच्या ठिकाणी मायेने गावकऱ्यांनी घरात घेऊन जेवू घातले, राहायला जागा दिली. तसेच पूर्ण मोहिमेत बऱ्याच जुन्या जाणत्या साह्यभटक्यांचे मार्गदर्शन मिळाले. परिवाराच्या सदस्यांनी तसेच मित्र-आप्तेष्टांनी टप्प्या-टप्प्यात साथ दिली, सहकार्य केले.

अनेक दुर्गम गावांना , तेथील गरीब लोकांना, गडकिल्ल्यांना, पुरातन मंदिरांना या मोहिमेत भेटी दिल्या. परिवाराच्या माध्यमातून पुढील काळात नक्कीच यांचे जतन संवर्धन करण्यात येईल.सह्याद्रीच्या कितीही प्रेमात असलात तरी 10-12 दिवसांनी शरीर व मन बोलायला लागतं. डोंगर, परिसर बदलत असले, तरी रोजच्या पायपीटीनं कधी ना कधी एकटेपणाची जाणीव व्हायला लागते किंवा काय होईल याची खात्री नाही, तरी चालतच राहायचं. प्रचंड जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ही मोहीम पूर्ण झाली. असे संतोष श्रीपती आलम यांनी सांगितले.

घाटमाथ्यावर अगदीच सपाटी नाही. कुठे एखादा डोंगर चढायचा, तर मध्येच एखादी छोटी दरी आली, उतरून परत वाटेवर यायचं, प्रदेश, भाषा, खाणेपिणे बदलत राहते, वाटा चुकतो, दमछाक होते. पण त्या सगळ्या अडीअडचणींवर मात करत ह्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून चालण्याचा विचार खूपच धाडसी आणि अद्भुत आहे. असे चेतन चंद्रकांत चव्हाण म्हणाले. गडकोट संवर्धनाचा वसा घेऊन सुरू केलेल्या ह्या यात्रेत सह्याद्री आणि वन्यजीव रक्षणाची ओढ लागली. संरक्षित अभयारण्यामध्ये योग्य ती काळजी घेऊन जंगल भ्रमंतीला चालना दिली पाहिजे. अतिशय शारीरिक अन्‌‍‍ मानसिक कसोटी पाहणारी ही मोहीम होती.असे संदीप यशवंत धोदरे यांनी सांगितले.

Exit mobile version