बाळांनो, दुःखातून सावरा! आम्ही आपली जबाबदारी स्वीकारलीय

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
कोरोनाने संपूर्ण जग कवेत घेतले. आपले जीवलग व आधारस्तंभ असलेले नातेवाईक हिरावून घेतले. हे दुःख आभाळाएवढे आहे. बाळांनो, या दुःखातून सावरा, आम्ही आपले पालकत्व व जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलीय, अशी ग्वाही राज्याच्या उद्योग, फलोत्पादन व पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सरकारच्या वतीने दिली. पालकमंत्री आदिती तटकरे पालकत्व गमावलेल्या लहानग्यांना आपुलकीने कवेत घेताना अत्यंत भावुक झाल्या. जिल्हाधिकारी रायगड व जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प यांच्या वतीने कोव्हिडमुळे आई व वडील गमावलेल्या व शासनाकडून पाच लाख रुपये अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी असलेल्या मुलांना ठेव प्रमाणपत्र पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते शनिवारी सुपूर्द करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, शेकाप नेते तथा जि.प. सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, जिल्हा परिवेक्षक अधिकारी अशोक पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सुजाता सकपाळ, पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, रोहा तहसीलदार कविता जाधव, उपप्रकल्प प्रमुख वात्सल्य ट्रस्ट सुचेता मेहंदळे पटवर्धन, माजी सभापती साक्षी दिघे आदी उपस्थित होते.

Exit mobile version