। सुतारवाडी । वार्ताहर ।
जुलै महिना संपत आला तरी सातत्याने मुसळधार पडणार्या पावसामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. जून, जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्यानंतर निसर्ग हिरवी शाल पांघरायला सुरुवात करतो. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने निसर्गाने सर्वत्र हिरवी शाल पांघरली आहे. अशा ठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटक आपल्या कुटुंबासह येत असतात. ताम्हाणी घाटातील निसर्गाचे सौंदर्य तर विलोभनीय असते. त्या ठिकाणी अनेक वर्षापासून निसर्गाचे सौंदर्य आणि डोंगरावरून जमिनीवर कोसळणारे फेसाळ पाणी धबधब्यावर वाहताना त्याखाली अंघोळ करण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र, पर्यटकांचा थिल्लरपणा आणि जीव घेणे प्रसंग शासनाने दिलेले नियम मोडणे यामुळे अनेक वेळा बाका प्रसंग ओढावले. मृत्युचे प्रमाण वाढत होते त्यामुळे येथील पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली. मुशी, देवकुंड अशा पर्यटन स्थळांचे हि तेच झाले. त्यामुळे शनिवार, रविवार किंवा अन्य सुट्ट्यांमध्ये पर्यटक तिकडे फिरकलेच नाहीत. त्या गोष्टींचा मोठा फटका वाहतूक करणार्या वाहनांना तसेच स्थानिक व्यापार्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सुतारवाडी येथील धरणाच्या बाजूचा परिसर सुद्धा अत्यंत विलोभनीय आहे. या ठिकाणी ही धरणातील पाणीसाठा आणि सभोवतालचे निसर्ग पाहण्यासाठी विविध शहरांतील पर्यटक हजेरी लावत असतात. मात्र, यावर्षी सतत कोसळणार्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्यामुळे पर्यटन स्थळांकडे शुकशुकाट दिसत आहे.