। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीतील बार्डी गावापासून डिकसळ गावाकडे जाणार्या रेल्वे मार्गपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करून बनविण्यात आला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल 20 लाखांचा निधी ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यावर तीन महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, तीन महिन्यांतच या रस्त्यात खड्डे पडल्याने रस्त्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपनगरीय लोकल मधून उतरल्यावर बार्डी गावाकडे जाणारा रस्ता बनविण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या रस्त्याचा फायदा बार्डी, वावे, बेंडसे, भातगाव, वडवली,चांदई तसेच कडाव कडे जाणार्या वाहनचालक यांना फायदा होत असतो. त्यामुळे हा रस्ता सर्वांना फायदेशीर होईल असे वाटत असतानाच अवघ्या दोन-तीन महिन्यात या रस्त्यावर केलेले डांबरीकरण आरपार दिसू लागले आहे. रस्त्यावर करण्यात आलेले खडीकरण आणि डांबरीकरण नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेला, मातीचा भराव हा ठेकेदाराच्या मनानुसार टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 20 लाख खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी ग्रामीण रस्ते विकास यंत्रणाने करावी, अशी मागणी स्थानिक करू लागले आहेत.