राजनाला परिसर बनला हिरवागार
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्याचा पूर्व भाग ओलिताखाली आणण्यासाठी 60 वर्षांपूर्वी राजनाला कालव्याची निर्मिती करण्यात आली होती. या राजनाला कालव्याचे पाणी कर्जत तालुक्यातील 40 गावातील 2 हजारहुन अधिक एकर शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी दिले जात आहे. सध्या राजनाला कालवा परिसर कालव्याच्या पाण्यामुळे हिरवागार बनला आहे.

जेआरडी टाटा यांनी पुणे जिल्ह्यात बांधलेल्या आंध्रा धरणाचे पाणी रायगड जिल्ह्यात सोडले जाते. त्या पाण्याचा वापर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने राजनाला कालवा बांधला होता. हा कालवा साधारण 40 किलोमीटर लांबीचा असून त्याच्या माध्यमातून कर्जतच्या पूर्व भागातील 40 गावांमधील जमीन ओलिताखाली येत आहे. राजनाला कालव्याचे पाण्याचा उपयोग कर्जत तालुक्यातील 40 गावांमध्ये भाताची शेती करण्यासाठी करतात. राजनाला भागात भाताची लावणीचा जोर चढला आहे. त्यात मजुरांची कमतरता भासत असून दुबार भाताची शेती ही हक्काचे पीक देणारे शेती असल्याने प्रयोगशील शेती करताना शेतकरी दिसत आहेत. मात्र, हिरवेगार वातावरणामुळे कर्जत तालुक्यातील भाताची शेती फुलली आहे.
आम्हाला पावसाळ्यापेक्षा उन्हाळी शेतीतून चांगले पीक मिळते. त्यात पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे योग्य नियोजन असेल तर हमखास चांगले पीक मिळत असल्याने शेतकरी पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळाच्या शेती साठी अधिक उत्सुक असतात. तसेच, सर्व शेतकर्यांनी भाताची शेती किंवा तत्सम पीकाची लागवड करून चांगले उत्पादन घ्यावे. पीक घेण्याबरोबर पाणी येत असलेली एक इंच जमीन देखील वाया जाणार नाही याची काळजी शेतकर्यांनी घ्यावी.
विनय वेखंडे,
विक्रमवीर शेतकरी
पुढील वर्षी 2026 मध्ये राजनाला कालव्याचे पाणी शेवट पर्यंतच्या शेतकर्यांच्या शेतात कसे जाईल, याचे नियोजन आम्ही सुरु केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कामे आम्ही आताच प्रस्तावित करणार आहोत.त्याचवेळी भविष्यात करावी लागणारी नवीन कामे यांचा देखील अभ्यास सुरु असून टेल एन्ड पर्यंत पाणी पोहचवण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करीत आहे.
अमित पारधे,
अभियंता, पाटबंधारे कर्जत