चिपळूण-रत्नागिरी महामार्गाची दुरवस्था

सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आश्वासन फोल

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. परंतु, महामार्गावरील चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर, काही ठिकाणी रस्ते खचण्याची भिती वाहनचालकांना आहे. महिन्याभरानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

महामार्गावर आरवलीपासून पुढे चौपदरीकरणाचे काम उशिराने हाती घेण्यात आले असून आरवली ते हातखंबा यादरम्यान एकेरी मार्ग पूर्ण झालेला नाही. दुसऱ्या मार्गाचे काम सुरू असून खेरशेत, आरवली, धामणी, कडवई फाटा, तुरळपासून अगदी हातखंब्यापर्यंत रस्ता चौपदरीकरणासाठी डोंगर फोडण्यात आले आहेत. यामुळे याठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे मोठे दिव्य ठरत आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे चाकरमान्यांचा रोष कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण महामार्गाच्या पाहणीसाठी आले होते. चाकरमान्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षीही असाच बैठकांचा फार्स केला होता. तरीही खड्ड्यांतूनच प्रवास करत गणेशभक्तांना कोकणात जावे लागले होते.

महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण
जूनच्या सुरवातीलाच मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. महामार्गाची दुरवस्था झाल्याने अपघात वाढले आहेत. खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे. तसेच, काही ठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ही रखडले आहे.
मंत्र्यांचे आश्वासन हवेत
विरले गेल्या वर्षी महामार्ग पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी आठ दौरे केले होते. त्या दौऱ्यात त्यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका लेनचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते; मात्र ते हवेतच विरले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जूनअखेर महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. या निवडणुका संपून बराच काळ झाला तरीही महामार्ग पूर्ण झालेला नाही. यामुळे खड्ड्यातील प्रवास चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांच्या नशिबी कायम आहे.
Exit mobile version