निसर्ग वादळात मोठे नुकसान, लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्याला अठ्ठावन किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून, अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी पोलीस चौक्यांची आवश्यकता भासते. त्यानुसार सागरी किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे असते. मुंबईतील 1993 च्या बॉम्ब स्फोटानंतर काही कालावधीत हरिहरेश्वर येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. परंतु, निसर्ग चक्रीवादळात या पोलीस चौकीची मोडतोड झाली होती. अद्याप या पोलीस ठाण्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सागरी किनाऱ्याची सुरक्षा लक्षात घेता येथील पोलीस चौकीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी हरिहरेश्वर येथील नागरिकांनी केली आहे.
13 जुलै 1996 रोजी पोलीस चौकी उभारण्यात आली. रायगड पोलीस अधीक्षक माधवराव कर्वे, श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी विजयसिंह जाधव, श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील वरिष्ठ फौजदार अशोक जांभळे यांच्या उपस्थितीत हरिहरेश्वर पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. या पोलीस चौकी करीता हरिहरेश्वर ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली होती. काही वर्षातच मनुष्यबळ अभावी पोलीस चौकी बंद झाली. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू झालेल्या पोलीस चौकीच्या इमारतीला निसर्ग चक्रिवादळाचा फटका बसला. माजी सरपंच अमित खोत आणि सुयोग लांगी तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वखर्चाने इमारतीची डागडुजी केली. त्या नंतर काही दिवस पोलीस चौकीत दोन पोलीस कर्मचारी तैनात असायचे, मात्र गेली चार वर्षे सदरची पोलीस चौकी मनुष्यबळा अभावी बंद अवस्थेत असून दुर्लक्षित इमारत मोडकळीस आली आहे. येथील स्थानिकांनी चौकीचे नुतनीकरण करून किमान दोन पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पोलीस चौकीसाठी जागा ग्रामपंचायतने दिली आहे. पूर्वी येथे चौवीस तास कर्मचारी असायचे. त्यामुळे स्थानिकांना मदत होत होती. मात्र, चक्रीवादळा नंतर चौकीची दुरवस्था झाली आहे.
सुयोग लांगी,
माजी सरपंच, हरिहरेश्वर.
मंदिर प्रशासनाने त्याच्या भक्त निवासमधील एक खोली वापरण्यास दिली आहे. पोलीस सध्या तेथून कारभार पाहत आहेत. हरिहरेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ परिसरात विकास आराखडा तयार करण्यात येत आहे, त्यामध्ये नवीन चौकीचा प्रस्ताव दिला आहे.
उत्तम रिकामे
पोलीस निरीक्षक श्रीवर्धन पोलीस ठाणे