। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत-कल्याण या राज्यमार्गावरील नेरळ परिसरात राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून डांबरीकरण करण्यात आल्यानंतर आता या रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून नुसती खडी शिल्लक राहिल्याने या राज्यमार्गावरून प्रवास करणे मोठे धोक्याचे बनले आहे. सध्या या राज्यमार्गावर मोटारसायकलला अपघात घडतात तर मोठी चार चाकी वाहने स्लिप होत असल्याने याचा एक व्हिडिओ प्रवाशी वाहन चालकाने सोशल मीडियावर व्हायरलदेखील केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत उपाय योजना करावी अन्यथा येथे मोठी दुर्घटना घडेल म्हणून सांगण्यात येत आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग हा सुरुवातीपासूनच वादाचा केंद्र स्थानी राहीला आहे. याला कारण यावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबलेली नाही. रस्त्याच्या कामात नियोजनाचा अभाव असून अद्याप या रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट असल्याने तसेच, सूचना फलकाचे अभाव यामुळे अपघाताची मालिका सुरू असल्याचे समजत आहे. मान्सून सुरू होण्याच्या काही दिवस आधी ह्या रस्त्याच्या ठेकेदाराकडून रस्त्यावर डागडुजी करण्यात आली होती. कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील नेरळ या शाळेच्या मार्गाचा येथून ते नेरळ ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत डांबरीकरण रस्त्यावर पुन्हा एकदा डांबरी खडीच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता. दरम्यान, आता ह्याच रस्त्याची डांबर पावसाच्या पाण्यात विरघळून गेल्याचे चित्र असून केवळ रस्त्यावर खडी पसरली आहे, हि खडी रस्त्यावर पसरल्याने येथून प्रवास करणारे वाहनचालक मात्र यांनी धास्ती घेतली आहे. रात्रीच्या वेळात मोटारसायकलचे येथे अपघात घडत असून मोठी वाहने वळणावर स्लिप होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढे एखादा मोठा अपघात होण्याची भीतीदेखील वर्तवण्यात येत आहे.






