नेरळ खांडा पुलाची दुरवस्था

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ रेल्वे स्टेशनमधून कल्याण रस्त्याकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील लहान पूल धोकादायक बनला आहे. या पुलाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

हा पूल धोकादायक अवस्थेत असून पूल वाहतुकीस बंद झाला तर वाहनांना थेट गणेश घाट येथून फेरा मारावा लागणार आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून या पुलाच्या पृष्ठभागावर सिमेंट काँक्रिटचा थर घालण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे लोटली असून नेरळ खांडा येथील पूल आता नादुरुस्त अवस्थेत आहे. त्या पुलावरील वाहतूक कधीतरी बंद होऊ शकते, याची नोंद घेण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केली जात आहे. जिल्हा परिषदेकडून सातत्याने त्या पुलाच्या दुरुस्तीबद्दल कोणत्याही प्रकारची कामे प्रस्तावित करण्यात आलेली नाहीत.आता पावसाळा सुरु झाला असून या कमी उंचीच्या पुलावरून दरवर्षी पुराचे पाणी वाहून जात असते. धोकादायक बनलेल्या या पुलाची दुरुस्ती जिल्हा परिषद करणार आहे काय? असा प्रश्‍न टॅक्सी संघटनेकडून अध्यक्ष नरेंद्र कराळे यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version