आंबेवाडी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गुरूवारी (दि.11) रस्त्यावर उतरून ठेकेदाराच्या विरोधात आंदोलन छेडले. येत्या दोन दिवसात दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करा, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंबेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळू नका, आता आमचा अंत पाहू नका, निकृष्ट दर्जाच्या कामात वेळीच सुधारणा करा, दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रस्ते नव्याने करा, अर्धवट कामांची दुरूस्ती करा, मनमानी पद्धतीची कामे थांबवा, पडलेल्या खड्ड्यांची तसेच जागोजागी साचून राहत असलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावा, नव्याने बांधण्यात आलेल्या गटारांना भगदाडे पडले आहेत ती दुरूस्त करा, खराब कामांमुळे वाढते अपघात आणि होत असलेली वाहतूक कोंडी तसेच प्रवाशांची हेळसांड यासाठी ठेकेदाराला जबाबदार धरा, अशा विविध मागण्या आंबेवाडी कोलाड ग्रामस्थांनी केल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाका येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडवरून वाहतूक वळविण्यात आली असुन हे दोन्ही रस्ते अक्षरशः अवजड वाहतुकीने निकामी झाल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. प्रवासी वर्गासाठीदेखील धोकादायक ठरत आहेत. कोलाड-आंबेवाडी ग्रामस्थांनी अनेकदा ठेकेदारासहित प्रशासनाला विनंती केली होती. तरीही अजून ठेकेदाराच्या मनमानीनुसार काम सुरु आहे. यामुळे गुरूवारी(दि.11) चौथ्यांदा संबंधित ठेकेदाराविषयी असंख्य नागरिकांनी कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांच्या समवेत संबधीत ठेकेदार आणि प्रशासकीय यंत्रणेकडे दुरुस्तीची मागणी केली आहे.
आंबेवाडी नाक्यावरील रस्त्याचे कामात ठेकेदाराकडून मनमानी सुरु असून या कामात ठेकेदार कामचुकारपणा करीत असून तो नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. रस्त्याच्या साईडच्या गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे केले असून त्या गटारावर झाकण नसल्यामुळे गटारात नागरिक व पशुप्राणी पडून जखमी होत अपघाताला कारण ठरत आहेत. उड्डाणपुलाचे काम ही धिम्या गतीने सुरु आहे.सदर उड्डाण पुलाचे काम करताना बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम केले नाही. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. प्रवासी शेड तोडली आहे.ती बांधण्यात यावी. ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर संबधित ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.
यावेळी कोलाड सपोनि. नितीन मोहिते, चंद्रकांत लोखंडे, संजय कुर्ले, सुरेश महाबळे, योगेश सानप, चंद्रकांत जाधव, शिवराम महाबळे, प्रकाश सर्कले, महेंद्र वाचकवडे, विजय बोरकर, राकेश लोखंडे, बाळु वाणी, कैलास भगत, गणेश ठोंबरे, अभि वाणी, राजु वडे, आंब्रुसकर, सावंत वैभवसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण टोलच्या माध्यमातून सर्व कामांचा आढावा घेतला आहे तर येत्या दोन दिवसात यावर उपाय योजना केल्या जातील. तसेच प्रवाशी वर्गाचा प्रवास सुखकर होईल अशी माहिती कल्याण टोलचे अधिकारी यांनी यावेळी उपस्थित आंबेवाडी नागरिकांना दिली.
कोलाड आंबेवाडी नाक्यावर झालेली दुरवस्था ही भयानक झाली आहे. येथील ग्रामस्थांनी अनेकदा निवेदन दिले आहेत. परंतु याची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा ग्रामस्थांनी आज तक्रार केली असून यावर संबधित ठेकेदारांचे अधिकाऱ्यांना बोलावून समज दिली असून ते लवकरच उपाय योजना करणार असून यावर लक्ष केंद्रित केले जाईल अशी माहिती कोलाड सहाय्यक पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांनी दिली.
आता कामे नीट करा, प्रवासी, ग्रामस्थ तसेच वाहनचालकांचा अंत पाहू नका. तीन वेळा सयंमतेची भूमिका घेतली आहे. पडलेले खड्डे आणि वाढते अपघात तसेच वाहतूक कोंडी त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः धावाधाव होत आहे. तसेच पाणी साचून राहिल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावी, अन्यथा वेळ पडल्यास रस्त्यावर बसू
चंद्रकांत लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ते आंबेवाडी







