महामार्गाला आले तलावाचे स्वरुप
| सुकेळी | वार्ताहर |
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणच्या रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरवर्षीप्रमाणे पावसाळा सुरु झाला की मुंबई-गोवा महामार्गाची होणारी दयनीय अवस्था ही परंपरा यावर्षीच्या पावसातदेखील कायम राहिली आहे. त्यामुळे या महामार्गाबद्दल पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याचे काम हे अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नसून, जे काही काम झाले आहे, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे प्रवासी व वाहनचालकांमधून ऐकावयास मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणच्या रस्त्यावरील काही ठिकाणी योग्यरित्या काम न झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे महामार्गाला तलावाचे स्वरुप आले आहे. याचचे एक उदाहरण म्हणजे, वाकण पुलानजीक रस्त्यावर पूर्णतः पाणीच पाणी झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील रस्त्याचे काम करताना ज्या साईडपट्ट्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक वाहने ही साईडपट्टीवरती उतरल्यानंतर त्या वाहनांचे टायर हे त्या मातीमध्ये अडकून वाहने मातीमध्ये फसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई -गोवा महामार्गाच्या गलथान कारभाराबद्दल नाराजीचे सूर उमटत आहेत.