| महाड | प्रतिनिधी |
पंढरपूर महाड ते म्हाप्रळ हा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा एक महत्त्वपूर्ण खाडी विभागातून जाणारा मार्ग असल्याने पुणे भोर पंढरपूर येथून जाणारी प्रवासी वाहतूक या मार्गावरून होते, त्याचप्रमाणे अनेक गावांना जोडणारा हा मार्ग आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली असल्याने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी खाडी विभागातील ग्रामस्थांनी केली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या आंबडवे हे ठिकाण देखील याच मार्गावर असल्याने हा मार्ग दुपदरी करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. 2017 मध्ये राजेवाडी फाटा ते आंबडवे या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आले. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला करण्यात आला त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी रस्त्याच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता असूनही शासनाकडून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष तसेच विलंब होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोमेंडी ते ओवळे या मार्गावर सध्या काम सुरू आहे. ठिकठिकाणी काँक्रीट टाकण्यात आले असले तरी काम निकृष्ट असल्याने यावर्षीच्या पावसामध्ये रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला धोक्याचा झाला आहे. तसेच बेबलघर तेलंगे या गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर देखील खड्डे पडले असून रस्त्यावर सर्वत्र खडी पसरल्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. यावर्षी पावसाळा उशिराने सुरू झाला तरीही रस्त्याची दुरावस्था झाली. राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
पंढरपूर महाड म्हाप्रळ रस्त्याची दुरावस्था
