माथेरानमधील रस्त्यांची चाळण

व्यापारी, पर्यटकांमध्ये संताप

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमधील मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक पावसाने वाहून गेले आहेत. यामुळे येथील रस्त्यांची चाळण होऊन गटाराचे स्वरूप आलेले आहे.

धुळविरहीत रस्त्याला एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार सनियंत्रण समितीने रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यास परवानगी दिली होती. यामुळे येथील धुळीचे प्रमाण काहीअंशी का होईना कमी झाले आहे. तर, नेहमीच विकासाला विरोध करणार्‍या राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळींना मुळातच हे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते नकोशे वाटत असतात. एकीकडे याच क्ले ब्लॉकच्या रस्त्याचा वापर सुध्दा करायचा आणि विरोधी भूमिका पण घ्यायची, अशा परिस्थितीत गावाचा विकास खुंटत चालला आहे. काही ठिकाणी जुन्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे प्रवास करताना पर्यटकांना, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यातच आता नवीन ब्लॉक लावण्यास सध्यातरी कोर्टाने बंदी घातली आहे. यामुळे जुने ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करावेत, नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच ही रस्त्यांची महत्वपूर्ण अत्यावश्यक सुविधा पूर्णत्वास न्यावी जेणेकरून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होणार नाही, अशी मागणी स्थानिक तसेच व्यापारी वर्गातून केली जात आहे.

हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग मार्केट हे गजबजलेल्या परिसरात असून नगरपरिषदेने प्रथम याच रस्त्याला क्ले पेव्हर ब्लॉकचा पायलट प्रोजेक्ट बनवला होता. पण आज या रस्त्याची अतिशय खराब परिस्थिती झाली आहे. या रस्त्यावरूनच महत्वाच्या भागात जाण्यासाठी सततची रहदारी सुरू असते. पण नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. कित्येक पर्यटक अपघात होऊन जखमी झाले आहेत. तरीही हा रस्ता अनेक महिन्यांपासून दुरुस्त केला जात नाही.

– प्रदिप घावरे, माजी नगरसेवक

या विषयावर नगरपरिषदेच्या कार्यालयात लेखी निवेदने दिलेली असून आम्ही खुप वेळा सोशल मीडियावर मॅसेज करूनसुद्धा कोणी अधिकारी इकडे डोकाऊन पाहतसुध्दा नाही. या रस्त्यावर मुख्य शॉपिंग सेंटर तसेच काही महत्वाची हॉटेल्स आहेत. अनेक पर्यटक या रस्त्याबाबत विचारणा करतात की, हा रस्ता एवढा खराब कसा, इथले प्रशासन काही लक्ष देते की नाही.

– वैभव पवार, व्यापारी माथेरान

Exit mobile version