उरण तालुक्यातील रस्त्‍यांची धुळधाण

प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताचा धोका

। उरण । वार्ताहर ।

उरण-करंजा या मुख्य रहादारीच्या रस्ताला पावसात सतराशे साठ खड्डे पडले असून रस्ता धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री द्रोणागिरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची धुळधाण झाली आहे. तरी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीमधील पंचवीस ते तीस हजार नागरिकांना उरण बाजारासाठी तसेच उरण ते अलिबाग जल प्रवास करणाऱ्यांसाठी करंजा-उरण या मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो. अशा रहदारीच्या रस्त्यावर जीओची केबल टाकण्यासाठी आणि जलजीवन योजने अंतर्गत पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी डाऊर नगर, मुळेखंड ते करंजा या ठिकाणावर खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामांमुळे व सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून वाहतूकीसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. तरी, संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करंजा ग्रामस्थांनी संबंधित खात्याकडे केलेल्या पत्रव्यवहारातून केली आहे.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असेल तर याही मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

   – सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ते 
Exit mobile version