साळाव-मुरुड रस्त्याची दुरवस्था; वाहनचालकांसह पर्यटकही हैराण

Exif_JPEG_420

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

| कोर्लई | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षांपासून साळाव-मुरुड रस्त्यावर विहूर पूल, नवीन मजगाव, उसरोली फाटा, नांदगाव मच्छिमार्केट, स्टेट बँक, वाघोबा मंदिर, दांडा, काशिद बीच, यु-टर्न, बोर्ली स्टँड, कोर्लई, साळाव पूल-चेकपोस्ट नाका येथील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून, दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागणार तरी कधी, असा संतप्त सवाल पर्यटक, वाहनचालक व प्रवाशांकडून विचारला जात आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

खड्ड्यांच्या त्रासानंतर गेल्या अनेक दिवसांपासून साळाव-मुरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या झाडाझुडुपांचा विळखा तसेच काही ठिकाणी खाली आलेल्या झाडांच्या फांद्या वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. विहूर, मोरे ते मजगाव, उसरोली फाटा, नांदगाव बाजार ते बाजारपेठ, वाघेश्‍वर नगर, दांडा, सर्वे, काशिद, काशिद यु-टर्न, बारशिव, बोर्ली स्टँड, कोर्लई भागात रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालक यांना अद्यापही त्रास सहन करावा लागत आहे. मुरुड-जंजिरा किल्ला, काशिद बीच पर्यटनात याठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते, तर शनिवार-रविवारी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा असून, वेळप्रसंगी ट्रॅफिक जामला सामोरे जावे लागते आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वेळोवेळी वृत्तपत्रातून देण्यात आलेले वृत्त सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षीय संघटनांची मागणी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्यावर विहूर, मोरे, सर्वे भागात डांबरीकरण करण्यात आले असले तरी ते पूर्णपणे उखडले गेले आहे. यात विहूर पेट्रोल पंप ते मोरे नवीन मजगावदरम्यान रस्त्यावरील अर्धवट केलेले डांबरीकरण उखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

पावसाळा संपल्यानंतर दिवाळी सुट्टीत मौजमजा मस्ती समुद्रसफरीचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी येथील पर्यटनात चांगले सुस्थितीतील रस्ते यांचा अभाव यामुळे परिणाम दिसून येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version