जि.प.च्या शाळांची बिकट अवस्था

शिक्षकांविना शाळा ओस

| म्हसळा | वार्ताहर |

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ऐशीतैशी झाल्याचा प्रकार समोर येत आहे. एकूण मंजूर शिक्षकांपैकी जेमतेम 50 टक्केच शिक्षक कार्यरत असून, 11 पैकी एकही केंदप्रमुख कार्यरत नाही. शाळेतीलच शिक्षकांकडे केंद्रप्रमुखांचा कार्यभार देऊन सर्व कारभार वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था पहावयास मिळत आहे, अशी माहिती माजी सभापती रवींद्र लाड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांची भेट घेत दिली.

यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षकांच्या जिल्हा बदलीमुळे अनेक शिक्षक हे न्यायालयात गेले, त्यामुळे गेली वर्षभर तालुक्यातील शिक्षणाचा पाया घसरला. अनेक मराठी शाळा शिक्षक नसल्याने ओस पडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पट असल्याने तिथे दोन किंवा तीन शिक्षकच शिक्षणाचा गाडा हाकत आहेत. स्थानिक सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे, तो प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे, त्याला त्वरित मंजुरी मिळावी, तसेच जिल्ह्यात अनेक सुशिक्षित डी.एड. पदवी प्राप्त बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधीची वाट बघत असताना त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी डॉ. बास्टेवाड यांच्या निदर्शनास आणून दिले.

जलजीवन योजनेचे तालुक्यात तीनतेरा वाजले आहेत, अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्यांची पाहणी करणे, तालुक्यातील आरोग्यची ग्रामीण भागात बिकट अवस्था असून, खरसई, जांभुळ, नेवरुळ, कोळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करुन मिळावे, अशी मागणी रवींद्र लाड यांनी भेटीदरम्यान केली. यावेळी डॉ. बास्टेवाड यांनी लवकरात लवकर तालुक्यातील शिक्षणाचा पाया सुधारला जाईल व सेवानिवृत्त शिक्षक भरती लवकरच पूर्ण करण्यात येईल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Exit mobile version