पथदिवेच नसल्याने अंधाराचे साम्राज्य
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहर आता वाढत्या लोकसंख्येनुसार नगरपंचायत बनण्याच्या वाटेवर आहे. मात्र, येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचीच वाट बिकट होत चालली आहे. शहरातील हिंदू स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडतर बनला असून, रस्त्याला पथदिवे नसल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाताना अंधारातून चाचपडत चालावे लागते.
बोर्लीपंचतन शहरातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कित्येक वर्षे दुर्लक्षित आहे. शिवाय रस्त्यावर पथदिवे नसल्याने प्रत्येक दुःखद प्रसंगाला नाराजी व्यक्त केली जाते. याठिकाणी अनेक स्मशानभूमी आहेत. मात्र, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि याच मार्गावर चार ते पाच विद्युत खांब असूनसुद्धा त्यावर पथदिवे नसल्याने सर्वत्र अंधार पसरलेला आहे. त्यामुळे रात्रीबेरात्री अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीने सुचवलेली कामे शासनाकडून केली जातात. त्याप्रमाणे मागणीसुद्धा करण्यात येते. मात्र, अद्यापही अनेक कामे अपूर्ण आहेत. जिल्हा परिषद बांधकाम खात्यामार्फत ही विकासकामे होणे गरजेचे आहे. तर, दुसरीकडे रस्त्यावरील पथदिव्यांच्या समस्येबाबत महावितरण अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. स्मशानभूमी परिसरातील रस्त्यांवर दिवे लागल्यास रात्री उशिराही सोयीचे होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी लोक्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या रस्त्याची दुरुस्ती व पथदिवे बसवून घेण्यात यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
गावातील अंतर्गत रस्त्यासाठी मागणीनुसार जिल्हा परिषदेमार्फत निधीची तरतूद करण्यात येते. तसा बोर्ली स्मशानभूमी रस्ता दुरुस्ती प्रस्ताव वरिष्ठांकडे देण्यात आला आहे.
प्रवीण मोरे, उपअभियंता, जि.प. श्रीवर्धन विभाग
स्मशानभूमी मार्गावर पथदिवे बसवण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आलेली नाही. मागणीनुसार त्याठिकाणी पथदिव्यांची सुविधा देण्यात येईल.
निखील नावकार, अभियंता, बोर्लीपंचतन कार्यालय






