वावे-बेलोशी रस्त्याची दुरवस्था

लाखो रुपये खर्चूनही खड्ड्यातून प्रवास

| अलिबाग | प्रतिनिधी |

तालुक्यातील वावे-बेलोशी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन वर्षात लाखो रुपयांचा निधी खर्च केला. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे यंदाही पावसाळ्यात प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ येत आहे.

अलिबागपासून पंधरा किलोमीटर अंतरावर वावे नाका आहे. या नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर बेलोशी गांव आहे. वावे नाका ते बेलोशी या रस्त्यासाठी अर्थ संकल्पातून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. रुंदीकरणाबरोबरच खड्डे बूजविणे, कारपेट टाकणे, डांबरीकरण करणे अशा अनेक प्रकारची कामे होती. मात्र, हे काम अपूर्ण राहिल्याचे चित्र आजही दिसून येत आहे. या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही पावसाळ्यात हा रस्ता खराब होत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहन चालविण्याबरोबरच पादचाऱ्यांनादेखील या खड्ड्यातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच, खड्डयांमुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. दगड, खडी रस्त्यावर आली आहे. या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताची भिती निर्माण झाली आहे.

या रस्त्यासाठी पुन्हा अर्थसंकल्पातून निधी मंजूर झाल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपलब्ध झाली आहे. मात्र, निवडणूक व अन्य कारणे दाखवून या रस्त्याचे काम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने टाळाटाळ केल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे. वावे ते बेलेोशी पर्यंतचा रस्ता खराब झाल्याने प्रवासी वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उपअभियंत्याचा खोटारडेपणा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजू डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याची डागडूजी पावसाळ्या पुर्वी करण्यात आली आहे. सध्या पाऊस आहे, पाऊस थांबल्यावर खड्डे बूजविण्याचे काम पुन्हा केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. यातून या अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा दिसून येत आहे. उन्हाळ्यातदेखील या रस्त्यावर खड्डे होते. त्याची दुरुस्ती झाली नाही. ज्यावेळी पहिला पाऊस पडला. त्यावेळी वावे येथील रिक्षा चालक मालक यांनी सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर साचलेले पाणी बाहेर काढले. रस्त्यावर पडलेले खड्डे श्रमदातून बूजविण्याचे काम केले.
राजू डोंगरेवर वरिष्ठांकडून कारवाई
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे. या कामाची गती दिसून येत नसल्याने वरिष्ठांनीदेखील उपअभियंता यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात नोटीस बजावून कारवाईची मोहिम हाती घेतल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून उपलब्ध होत आहे.

पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. वावे – बेलोशी रस्त्यावरील खड्डे बूजविण्याचे काम लवकरच केले जातील.

राजू डोंगरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
Exit mobile version