खराब हवामानाचा मासेमारीला फटका

| कासा | प्रतिनिधी |

सततच्या खराब हवामानामुळे समुद्रात माश्यांचे प्रमाण बरेच घटले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील मच्छीमार व्यवसाय अडचणीत सापडला असून, मच्छीमार बोट व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

समुद्रातून मासे कमी मिळत असल्याने या व्यावसायिकांना बोट चालवण्याचा खर्च ही परवडेनासा झाला आहे. वर-वर सोपी वाटणारी मासेमारी मुळात खूपच कठीण असे काम आहे. समुद्राच्या भरती-ओहोटीचा अंदाज बांधून मासेमारी करावी लागते. सध्या तर सतत वातावरणात बदल होत आहेत. याचा फटका समुद्रातील जैवविविधतेलाही बसला आहे. फक्त वातावरणच नाही, तर मोठ्या जहाजांमधील खराब तेल आणि शहरातील सांडपाणी समुद्रात सोडले जाते. त्याचा फटका मासेमारीला बसत आहे.

मच्छीमार बहुतेक वेळा समुद्राच्या काही अंतरावर मासेमारी करण्याचा प्रयत्न करतात, पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांना खोल समुद्रात जावे लागत आहे. मात्र तेथे ही समाधानकारक मासेमारी होत नसल्याचे मच्छीमार मंडळी सांगतात. मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक बोटीचा खर्च खूप असतो. डिझेल, खलाशांची मजुरी, जाळी व इतर गोष्टींचा देखभालीचा खर्च याचा त्यात समावेश आहे. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात मासे न मिळाल्यास हा खर्च वसूल होत नाही आणि त्याचा तोटा सहन करावा लागतो. सध्या हाच खर्च परवडत नसल्याने डहाणूच्या समुद्रकिनारी असंख्य बोटी उभ्या करण्याचा निर्णय मच्छीमार व्यावसायिकांनी घेतला आहे. या परिस्थितीचा थेट फटका मच्छीविक्रीवर अवलंबून असलेल्या महिला विक्रेत्यांनाही बसत आहे. मागील अनेक दिवसांपासून मासेविक्रेत्या महिलांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चाचा प्रश्नही गंभीर बनला असल्याची माहिती महिला मच्छीमार विक्रेत्या देतात. याबाबत मासेविक्रेत्या सावली मोरे सांगतात, की दररोज मासे विकून घरखर्च चालवत असतो. मात्र गेल्या महिनाभरापासून मासेच मिळत नसल्याने आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मच्छीमार व मासेविक्रेत्यांनी शासनाकडे आर्थिक मदत, सवलती आणि तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली असून परिस्थिती लवकर सुधारावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version