उरण बागायतदारांना अवकाळीचा फटका

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून वातावरण आणि मंगळवारी (दि.7) बरसलेल्या अवेळी पावसामुळे आंबा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मोहरानी बहरलेले व काही ठिकाणी कैर्‍या धरलेले आंबापिक पूर्णता धोक्यात आले आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा बागेत कैर्‍यांचा गळून खच पडला असून, मोहराला या पावसामुळे आता बुरशी धरू लागली आहे. मोहोर पूर्णता काळवंडला. आंबा बागातदार शेतकरी चिंतेत पडले आहेत. यावर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. मात्र ढगाळ वातावरण आणि अवेळी पाऊस यामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पावसाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.

या वातावरणामुळे आंबा मोहोरावर तुडतुडा, लाल कोळी, भुरी रोग, मोहोर काळा पडणे, यातून चिकटी व पडण्याच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूसची जात जगप्रसिद्ध आहे. उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात या जातीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवेळी पाऊस, तापमानात वाढ आणि कमीपणा आदीबाबत शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा पीक योजना लागू करण्यात यावी, अशी येथील आंबा बागायतदारांकडून जोर धरू लागली आहे. आंब्याप्रमाणेच भाजीपाला फळांवर देखील या ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजी पिकविणार्‍या शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्याबरोबरच उरण तालुक्यात चिरनेर गावातील बागायतदारांना बदलत्या हवामानाचा व अवेळी पावसाचा चांगलाच फटका बसल्यामुळे कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, आंबा बागायतदार संतोष राजेंद्र खारपाटील भास्कर ठाकूर, कृष्णा म्हात्रे, अनिल केणी, महेंद्र मोकल, बाजीराव म्हात्रे, दत्तात्रेय म्हात्रे, हिराजी ठाकूर, दिलीप ठाकूर, अस्मित ठाकूर, अमित ठाकूर, कृष्णा केणी राजाराम केणी, धनाजी नारंगीकर, जनार्दन केणी, रवींद्र ठाकूर, के.बी. ठाकूर, गोपीनाथ गोंधळी, हरिश्‍चंद्र गोंधळी तसेच अन्य बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या वर्षी आंबा पिक येईल अशी या सर्व बागायतदार शेतकर्‍यांची अपेक्षा होती. परंतु नैसर्गिक बदलामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Exit mobile version