खराब हवामानाने मच्छिची आवक घटली

तीस बोटींना केवळ सफेद कोळीम
मुरूड । वार्ताहर ।

बदलते हवामान आणि अरबी समुद्रात होत असलेल्या वार्‍यांमुळे बोंबील, कोलंबीसारख्या मासळी ऐवजी गुरुवारी राजपुरी येथील सुमारे 30 छोट्या नौकांना मासेमारी करताना फक्त सफेद कोळीम (जवळा) मिळाला आहे. पावसाळ्यात समुद्रात कोळीम मिळत नाही. हा आजवरचा अनुभव आहे. आता बोंबील, कोळंंबीचा हंगाम असतो, अशी माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार धनंजय गिदी यांनी दिली. केवळ कोळीमच मिळाल्याने मच्छिमारांचा डिझेलचा खर्च देखील सुटू शकला नाही.

वादळी वातावरणामुळे ऑगस्टपासूनच मासेमारी ठप्प झाली होती. गणेशोत्सव नजीक असल्याने पैशाची मोठी चणचण मच्छिमारांना जाणवत आहे. मासळी मिळेल या अपेक्षेने छोटे मच्छीमार जंजिरा किल्ल्याच्या परिसरात बोंबील, कोळंंबीच्या मासेमारीस जात असतात. परंतु यावेळी त्यांना चक्क कोळीम सापडल्याने त्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे.

मार्केटमध्ये कोळीमला फारसा भाव मिळत नाही. या काळात बोंबील, कोळंबी अशी मासळी बेपत्ता झाली आहे. समुद्रात मोठे बदल दिसून येत आहेत. मानवाने केलेल्या अयोग्य कृतीमुळे वातावरणात प्रदूषण वाढले आहे. यामुळेच समुद्राचे रूप पालटत चालले आहे.

– धनंजय गिदी, मच्छीमार

जवळ्याचे सुकटीत रूपांतर
राजपुरी येथील मच्छिमारांना जवळा मिळाल्यानंतर येथील मासळी विक्रेत्या महिलांनी खाडीकिनारी धाव घेऊन जवळा खरेदी केला. तो लगेच किनारी असलेल्या सिमेंटच्या ओट्यावर वाळत घातला. ऊन पडल्याने जवळ्याचे सुकटीमध्ये रूपांतर झाल्यानंतर शुक्रवारी ही सुकट मार्केटमध्ये विक्रीस नेण्यात येणार असल्याची माहिती महिला विक्रेत्यांनी दिली. या सफेद सुकटीला मार्केटमध्ये बर्‍यापैकी भाव मिळतो. दरम्यान, वादळमुळे आगरदांडा-दिघी बंदराच्या आश्रयास आलेल्या मोठ्या नौका गुरुवारी पुन्हा खोल समुद्रात मासेमारीस रवाना झाल्या आहेत.

Exit mobile version