आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
भरधाव मोटारीच्या धडकेमुळे बुधवारी रात्री कोल्हापुर येथे झालेल्या तिहेरी अपघातात युवा बॅडमिंटनपटू वरुण रवी कोरडे (22) रा. उदयसिंगनगर जागीच ठार झाला. महावीर महाविद्यालयासमोर हा थरार घडला. भरधाव मोटारीने कसबा बावडा ते महावीर महाविद्यालयादरम्यान आणखी काही वाहनांना ठोकरल्याचे समजते. धडक देणाऱ्या मोटारीचा चालक ऋषिकेश बाबूराव कोतेकर (40) रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ गंभीर जखमी झाला आहे. तो बेधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळी होती. घटनास्थळी गर्दी झाली होती.
‘जीएसटी इंटेजिलन्स’ असा फलक लावलेली मोटार रात्री साडेदहाच्या सुमारास कसबा बावड्याकडून शहरात येत होती. या मोटारीने महावीर महाविद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या दोन मोटारींना जोरदार धडक दिली. याचवेळी मागून येणारी दुचाकी या गाड्यांवर आदळली. ही दुचाकी वरुण चालवत होता. यातील एक मोटार कोल्हापुरातून कऱ्हाडकडे निघाली होती. त्यातील लोक जोतिबा दर्शन करून कसबा बावडामार्गे शहराबाहेर जात होते. अपघातात या तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अपघातस्थळी गर्दी झाली. त्या दरम्यान पोलिस तेथे दाखल झाले. याच मोटारीने कसबा बावड्यातून कोल्हापूरकडे येताना चार ठिकाणी धडक दिल्याची एकच चर्चा घटनास्थळावरील गर्दीमध्ये होती. गर्दीमुळे पोलिसांना अपघातग्रस्त वाहने बाजूला करता येणे मुश्कील झाले होते. त्यामुळे पोलिसांनी लाठी उगारत गर्दी पांगवली.