बॅडमिंटनपटू लक्ष सेनवर वयचोरीचा गुन्हा

| बंगळुरू | वृत्तसंस्था |

भारताचा आघाडीचा बॅडमिंटन खेळाडू आणि सध्याचा कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन यांच्याविरुद्ध बंगळूरमध्ये वयचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम गोविअप्पा नागराजा यांनी बंगळूरमध्ये लक्ष्य सेन, त्याचे कुटुंबीय आणि बॅडमिंटनच्या राष्ट्रीय संघाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांना या वयाच्या फसवणुकीकरिता जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

लक्ष्य आणि त्याचा मोठा भाऊ चिराग हे दोघेही 2010 पासून विविध स्तरांवरच्या बॅडमिंटन स्पर्धेत खेळावयास मिळण्यासाठी वय लपवत आहेत, असे नागराजा यांनी या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत सेन याचे वडील धीरेंद्र, आई निर्मला आणि प्रशिक्षक कुमार यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि भारतीय दंडसंहितेच्या 34 व्या कलमानुसार दोषी ठरवण्यात यावे, असेही नागराजा यांनी म्हटले आहे.

लक्ष्य सध्या बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. त्याला आताच देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ब्राँझ पदक जिंकले होते; तर या वर्षीच झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचासुद्धा तो उपविजेता राहिला आहे.

लक्ष्य याने भारतीय बॅडमिंटन संघटनेकडे त्याचा जन्मदिवस 16 ऑगस्ट 2001 असा नोंदवला आहे; तर चिरागने 22 जुलै 1998 असे नोंदवले आहे, पण तक्रारदारांच्या मते लक्ष आणि चिराग यांचे अनुक्रमे वय 24 व 26 आहे. लक्ष्य आणि चिरागवरचे हे वयचोरीचे आरोप सिद्ध झाल्यास दोघांनाही त्यांना मिळालेल्या पुरस्कारांवर पाणी सोडावे लागणार आहे.

Exit mobile version