। चेन्नई । वृत्तसंस्था ।
भारतीय संघातील एका अशा माजी खेळाडूचा आज वाढदिवस आहे, जो आपल्या विश्वासू फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. पण भारतीय संघातून अवघे हातावर मोजण्याइतकेच सामने खेळू शकला. संघात अनेक दिग्गज खेळाडू असल्याने त्याची क्रिकेट कारकीर्द अधिक काळाची होऊ शकली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणार्या या खेळाडूने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली होती. पण तरी भारताकडून खेळताना त्याला फार कमी संधी मिळाली. या क्रिकेटपटूचे नाव सुब्रमण्यम बद्रीनाथ आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघातील महत्त्वाचा फलंदाज खेळणारा बद्रीनाथ भारतासाठी दोन कसोटी सामन्यांसह केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला.
बद्रीनाथने भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात सामने खेळले. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं. तर एकदिवसीय सामन्यात विजयी खेळी खेळली. तर टी-20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. बद्रीनाथने प्रथन श्रेणी क्रिकेटमध्ये 145 सामन्यात 54.49 च्या सरासरीने 10 हजार 245 धावा केल्या ज्यामध्ये 32 शतकं ठोकली. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 144 सामन्यात 36.84 च्या सरासरीने 4 हजार 164 धावा केल्या. याशिवाय स्थानिक 142 टी-20 सामन्यात 2 हजार 300 धावा बनवल्या. भारताकडून मात्र सात एकदिवसीय सामन्यात केवळ 79 धावाच बद्रीनाथ करु शकला. 2011 मध्ये तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.