बागमांडला-बाणकोट सेतू रखडला

निविदा अडकली लाल फितीत; पर्यटनाला मोठा फटका

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या बागमांडला-बाणकोट खाडीपुलाच्या कामाच्या नवीन निविदा पुढील पंधरा दिवसांत निघतील, असे आश्‍वासन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात बोलताना दिले होते. मात्र महिना होत आला तरी निविदा प्रसिद्ध न झाल्याने खासदारांचे आश्‍वासन हवेतच विरले की काय, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांत उमटत आहेत. शिवाय त्यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रायगडमधील बागमांडला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील बाणकोट या दरम्यान खाडीवर वरळी सी-लिंकप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महत्त्वाकांक्षी सागरी सेतू बांधण्याचे काम 2013 पासून सुरू झाले. पुलाची लांबी जोडरस्त्यासह 1800 मीटर इतकी असून रुंदी 12.50 मीटर इतकी आहे. पुलाच्या मध्यवर्ती गाळ्यांचे काम वरळी सी-लिंकप्रमाणे केबल स्टे या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने पूल पर्यटकांसाठी आकर्षण, तर दळणवळणासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. पुलामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुलभ होऊन कोकण, गोव्याला जाण्यासाठीचे अंतर कमी होणार आहे.

रायगड व रत्नागिरी जिल्हा सागरी मार्गाने जोडले जाणार आहेत. त्यामुळे दळणवळणासह पर्यटनदृष्ट्या विकासाला चालना मिळेल. हा सागरी सेतू 2016 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अद्यापही हा सेतू अपूर्ण असून त्याचे काम रखडले आहे. तीन डिसेंबर 2023 रोजी श्रीवर्धन येथे जलशुद्धीकरण, श्रीवर्धन किनार्‍यावरील सुशोभीकरण तसेच रानवली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खासदारांनी जनसमुदायासमोर बागमांडला पुलाचे काम पंधरा दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल, असे आश्‍वासन दिले होते.

मात्र जानेवारी 2024 संपायला आला तरी कामाची निविदा न निघाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याशिवाय सहा जानेवारीला दिवेआगर येथे पत्रकार परिषद घेत बागमांडला-बाणकोट पुलाची प्रशासकीय मान्यता आणि दिघी-आगरदांडा पुलाची निविदा पंधरा दिवसांत निघेल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र तेदखील अद्यापही पूर्ण झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बारा वर्षे तरीही अपूर्ण
सध्या अर्धवट स्थितीत सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी बागमांडला-बाणकोट सागरी सेतूचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सुरू होते. त्याचे भूमिपूजन नोव्हेंबर 2012 मध्ये झाले, तर 2016 मध्ये पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप 30 ते 40 टक्केच काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून पुलाचे काम बंद आहे.
कोट्यवधी पाण्यात?
बाणकोट खाडीवरील पुलासाठीचा अंदाजित खर्च 182 कोटी रुपये इतका होता. मात्र सद्यस्थितीतील बांधकामाचा कालावधी आणखी वाढल्याने खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आता नव्याने त्याच पुलाच्यालगत नवीन पूल बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Exit mobile version