एकाचा अटकपूर्व जामीन नामंजूर
| अलिबाग । कृषीवल टीम ।
तिनविरा धरणावरील दरोडा प्रकरणातील अटक केलेल्या सहा आरोपींपैकी दोघांना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मंजूर झाला आहे. तर, तिघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच, फरार असलेल्या आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळाली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिनविरा धरणाजवळ दरोडा टाकण्यात आला होता. एका व्यापार्याने याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपासाची सूत्रे हालविण्यात आली. या गुन्ह्यातील पोलीस हवालदार समीर म्हात्रे, विकी साबळे यांच्यासह समाधान पिंजारी, विशाल पिंजारी, अक्षय खोत, दिप गायकवाड या सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस कोठडीनंतर विशाल आणि अक्षय याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. तसेच विकी साबळे, समीर म्हात्रे व दिप गायकवाड यांनीदेखील जामिनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी (दि.24) अलिबागमधील न्यायालयात या अर्जांवर सुनावणी होणार आहे.
फरार असलेला आरोपी हनुमंत सूर्यवंशी याने अलिबागमधील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला आहे. वेगवेगळ्या पथकामार्फत त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
पैसे घेऊन पसार झालेल्यांना असे पकडले
समाधान पिंजारीने विशालसोबत संपर्क साधून सांगलीमधून कार मागितली होती. त्या कारमध्ये दीड कोटी रुपये विशालच्या ताब्यात दिले होते. त्याच्यासोबत अक्षयही होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने माहिती घेऊन सांगली येथील आटपाडी येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त केली.
आमदारांची चौकशी होणार का?
अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरणाजवळ दरोडाप्रकरणी सहा आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. आमदारांनी दिलेले पैसे परत करण्यासाठी हा प्लॅन आखल्याचे पिंजारी याने पोलिसांच्या कबुली जबाबात स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभा निवडणूकीपूर्वी पिंजारी यांना दिलेल्या रकमेबाबत आमदारांची चौकशी होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.