खाणमालकाकडून शासनाची फसवणूक; अॅड. काशिनाथ ठाकूर यांचा आरोप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास गौण खनिजाच्या उत्खननाचा गोरखधंदा पालीतील पिलोसरी, भार्जे भागात खाणमालकांनी सुुरू केला आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने येथील खदान सफाचट करण्याचे काम गौण खनिज माफियांकडून केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे.
नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून कोट्यवधींची खडी व मुरुम खोदुन नेला जात आहे. विशेष म्हणजे दोन किंवा तीन गाड्यांना वाहतूक परवाना असताना 70 ते 80 हायवा वाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याची धक्कादायक बाबही अॅड. ठाकूर यांनी कृषीवलशी बोलताना दिली. याप्रकरणी त्यांनी अनेकदा संबंधित अधिकार्यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदवून चौकशीची मागणी केली.
वन्यजीवांना धोका
अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, खाणमालकाने प्रदुषण दाखविणारे यंत्र खडी क्रशर/क्वॉरीमध्ये बसविलेले नाही. तसेच त्याची नोंदवहीदेखील ठेवलेली नाही. याशिवाय त्याची माहिती महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला कळविलेली नाही. या खाणीला लागून जंगल असल्यामुळे त्या ठिकाणी अधिनियम लागु आहेत. झाडे व प्राणी त्या कायद्याच्या संरक्षणात असताना प्रदुषण व ब्लास्टींगमुळे वन्य प्राणी व झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ब्लास्टींगमुळे वन्यप्राणी भयभीत होत आहेत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वनविभाग निद्रावस्थेत
सुरेंद्र पाटील हे हायवा डंपरने सार्वजनिक रस्त्यामधुन वाहतुक करत आहेत. या डंपरमध्ये सुमारे 7/8 ब्रास ओव्हरलोड माल भरला जात असून, दररोज रात्रंदिवस 70 ते 80 डंपर चालून सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान करत आहेत.हे खाणकाम सार्वजनिक रस्त्यापासून 50 मिटर अंतरापासुन लांब असणे गरजेचे असताना मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवुन क्वॉरी धारकाने रस्त्याला लागुनच खाणकाम व्यवसाय चालु ठेवला आहे. वन विभागाची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशिरपणे रात्रीची झाडे तोडली जात असून, त्या जागेवर खाणकाम केले आहे. तसेच वनविभागाच्या जागेतही खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वनविभागच्या अधिकार्यांनीही आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा आरोप अॅड. ठाकूर यांनी केला आहे.
सुधागड तालुक्यातील पिलोसरी, भार्जे येथे उत्खनन सुरु आहे. रॉयल्टी भरुनच उत्खनन केले जात आहे. बाहेर असल्यामुळे अधिकची माहिती देऊ शकत नाही.
– उत्तम कुंभार, तहसिलदार, सुधागड
पिलोसरी, भार्जे येथे उत्खनन सुरु आहे. शासनाची रॉयल्टी भरुनच हे उत्खनन सुरु आहे. उर्वरित माहिती लवकरच देण्यात येईल.
– सुरेंद्र पाटील, खाणमालक
नाममात्र रॉयल्टी भरुन हजारो ब्रास खडीचे उत्खनन केले जात आहे. बोगस पावत्यांचाही वापर केला जात आहे. महसूल अधिकार्यांची मिलिभगत असल्यामुळे कारवाई होण्यात दिरंगाई होत आहे. हे उत्खनन तात्काळ न थांबल्यास 25 मार्चपासून उपोषणाला बसणार आहे.
– अॅड. काशिनाथ ठाकूर
पिलोसरी, भार्जे या ठिकाणी उत्खनन सुरु आहे. त्याबाबत अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी निवेदन दिले आहे. मात्र तब्येत बरी नसल्यामुळे खारघर येथे उपचार घेत आहे. येत्या दोन दिवसांत माहिती घेऊन नेमकं काय प्रकरण आहे, हे सांगतो.
– भारत फुलपगारे, नायब तहसिलदार
या नियमांचे होतेय उल्लंघन
1) महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास विनियमन) नियम 2013 चे उल्लंघन
2) मुंबई गौण खनिज उत्खनन नियम 1955 चे उल्लंघन
3) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे कलम 44 व कलम 48 चे उल्लंघन
4) महाराष्ट्र प्रदुषण कायदा 1986 चे उल्लंघन
5) खडी क्रशरकरीता लागणारा परवाना नाही.
6) प्रदुषण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही.
7) पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नाही.
8) उत्खनन करणार्या जागेसंबंधात बिनशेती परवाना नाही.
लागणारे अतिरीक्त परवाने
जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र
जिल्हा प्रशासनाकडून चारित्र्य प्रमाणपत्र
खाण भाडेपट्टा,
कचरा सामुग्रीचा विल्हेवाट लावण्याची पध्दत किंवा टीएसडीएफचे सदस्यत्व (लागू असल्यास)
स्थानिकांचे आरोग्य धोक्यात
खाणमालकाविरोधात तक्रार केल्यास नागरिकांना खाणमालकाच्या गुंडांकडून मारहाण केली जात असल्याचा आरोप अॅड. ठाकूर यांनी केला आहे. तसेच, ब्लास्टींग करताना वापरण्यात येणार्या स्फोटक रसायनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नवनवीन आजार बळावले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.