| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरात अनेक पाखाडीत कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ते नागरिकांसाठी धोकादायक बनत आहेत. हा धोका नागरिकांच्या जीवावर बेतू नये, याकरिता मुरूड- जंजिरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अलंकापुरी येथे अत्याधुनिक प्राणी नियंत्रण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राच्या प्रभावी व व्यावसायिक व्यवस्थापनासाठी पुणे येथील नामांकित संस्था पेटफोर्स यांच्याशी करारनामा करण्यात आलेला आहे. या अंतर्गत शहरातील भटके कुत्रे मानवी पद्धतीने पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून, आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, सुमारे 100 कुत्र्यांसाठी सुसज्ज आश्रयगृह उभारण्यात आले असून, त्यामध्ये स्वच्छता, अन्न-पाणी व आरोग्याची योग्य काळजी घेतली जाणार आहे. या उपक्रमामुळे कुत्र्यांची अनियंत्रित वाढ रोखणे, नागरिकांच्या सुरक्षेत वाढ करणे व प्राण्यांच्या कल्याणाचीही जपणूक करणे हे उद्दिष्ट साध्य होणार आहे.







