मर्यादित फेऱ्यांमुळे पर्यटकांचा हिरमोड; पुढल्या हंगामात फेऱ्या वाढविण्याची आशा
| नेरळ | प्रतिनिधी |
नॅरोगेजवर चालणारी नेरळ-माथेरान ही माथेरान येथील पर्यटनस्थळाचा आर्थिक कणा समजली जाते. यंदा अनेक वर्षांनी ही मिनीट्रेन पर्यटकांना चांगली सेवा देणारी ठरली आहे. परंतु, संपूर्ण उन्हाळी हंगाम पर्यटकांची गर्दी वाहून नेणारी मिनीट्रेन हेरिटेज नामांकन कधी मिळवणार? हा प्रश्न कायम आहे. तसेच, मिनिट्रेनचा यंदाचा उन्हाळी हंगाम चांगला गेला असला, तरी ती विविध समस्येंच्या गर्तेत सापडलेली आहे.
पर्यटकांना भल्या पहाटेपासून नेरळ स्थानकात तिकिटासाठी ताटकळत उभे राहावे लागते. परंतु, बहुतांश पर्यटकांना मर्यादित फेऱ्या असल्यामुळे तिकिट न मिळाल्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे माथेरानचा आर्थिक कणा समजल्या जाणारी मिनीट्रेन अनेक समस्यांच्या गर्तेत सपाडली आहे. दरम्यान, आजपासून माथेरानची राणी पावसळी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे नेरळ-माथेरान मिनिट्रेन पुढील चार महिने बंद राहणर असल्याने पर्यटकांचा आणखीनच हिरमोड झाला आहे.
जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख असल्यामुळे पर्यटक माथेरानला पहिली पसंती देत असतात. एप्रिल आणि मे महिना माथेरान पर्यटन हंगामाचा महत्वाचा महिना असल्याने या महिन्यात पर्यटकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन हॉटेल व्यावसायिक उतरल्याने माथेरान पर्यटकांच्या सेवेसह सज्ज झाले आहे. शाळांना असलेल्या सुट्ट्या आणि माथेरान मधील थंड हवामान लक्षात घेता आणि मुंबई पासून जवळ असल्याने पर्यटक माथेरानला पसंती देत असतात. त्याचबरोबर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास माथेरान या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हवाहवासा वाटत असतो. 21 किलोमीटर अंतर पार करीत असताना ही मिनीट्रेन तब्बल 220 वळणे घेऊन माथेरान येथे पोहचत असते. 800 मीटर उंचीवर असलेल्या माथेरान शहरात घेऊन जाणारी ही मिनीट्रेन आबालवृद्ध पर्यटकांची आवडती ठरत असते. माथेरान येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची मिनीट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र, नेरळ येथून जाणारी मिनिट्रेन येथील मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्यात गेल्या काही वर्षांपासून मिनीट्रेन सेवेचे ऑनलाईन तिकीट बंद आहे. त्यामुळे पर्यटक नेरळ जंक्शन स्थानकात भल्या पहाटे येऊन गाडीची तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. बहुतांश पर्यटकांना तिकिट न मिळाल्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे मिनीट्रेनचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी गाडीचे डब्बे आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न रेल्वेने सुरू केला आहे. नॅरोगेजवर चालणारी नेरळ-माथेरान ही माथेरान येथील पर्यटनस्थळाचा आर्थिक कणा समजली जाते. दरम्यान, यंदा अनेक वर्षांनी ही मिनीट्रेन पर्यटकांना चांगली सेवा देणारी ठरली आहे.
मिनिट्रेनला हेरिटेज नामांकन नाहीच
नेरळ-माथेरान नॅरोगेज ट्रक या मार्गावरील सर्व स्थानके, मिनीट्रेनच्या दिमतीला असलेली वाफेवर तसेच नव्याने बांधलेली इंजिने आणि माथेरान स्थानक हे हेरिटेज वास्तूत समाविष्ट होणार आहे. त्यासाठी मध्यरेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. मिनीट्रेन बरोबर माथेरानचा वारसा सांगणाऱ्या परंपरेला देखील हेरिटेज वास्तूत स्थान देऊन माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याचे महत्वाचे काम रेल्वे आणि माथेरान गिरिस्थान नगरपरिषद करू पाहत आहे. परंतु, असे असतानाही संपूर्ण उन्हाळी हंगाम पर्यटकांची गर्दी वाहून नेणारी मिनीट्रेन हेरिटेज नामांकन कधी मिळवणार? हा प्रश्न कायम आहे.
फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची गरज
नेरळ-माथेरान मार्गावरील मिनिट्रेनच्या दोन फेऱ्या सात-आठ महिने सातत्याने चालवल्या गेल्या आहेत. नेरळ येथून सकाळी दोन गाड्या सोडण्यात येतात आणि त्या गाड्या दुपार नंतर माथेरान येथून नेरळ करिता सोडल्या जातात. मिनीट्रेनच्या केवळ दोन फेऱ्या चालवल्या जात असल्याने अवघे 400 प्रवासी दिवसभरात प्रवास करीत असतात. त्यामुळे नेरळ येथून दिवसभरात किमान चार फेऱ्या व्हाव्यात, अशी मागणी गेली अनेक वर्षे सुरू आहे. या गाड्या चालवण्यासाठी रेल्वेकडे नेरळ लोको येथे किमान आठ इंजिन आहेत. असे असतानाही गाड्या वाढवण्यात येत नसल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पुढील हंगामापासून तरी मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जातील अशी अपेक्षा पर्यटकांना आहे.






