बजरंग पुनियासाठी पदकाचा मार्ग झाला खडतर

कुस्तीचे सामने ग्रीको-रोमन प्रकाराने होणार सुरू

| चीन | वृत्तसंस्था |

विशाल कालीरामनने 65 किलोच्या वजनी गटात सामने जिंकले होते आणि त्याचे कुटुंब आणि अनेक पंचायतींचे असे मत आहे की, बजरंगला ट्रायल सामन्यांशिवाय या खेळांमध्ये संधी मिळायला नको होती. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या बजरंगने या खेळांमध्ये भाग घेण्यापूर्वी कोणत्याही स्पर्धात्मक स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तो लेग डिफेन्समधील त्याच्या उणिवांवर मात करण्याचा प्रयत्न करत होता आणि किरगिझस्तानमधील 18 दिवसांच्या सराव आणि प्रशिक्षण सत्राचा त्याला कितपत फायदा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बजरंग आपल्या मोहिमेची सुरुवात फिलिपाइन्सच्या रोनील टुबोगविरुद्ध करेल. जर तो हा सामना जिंकून पुढे प्रगती करण्यात यशस्वी ठरला तर त्याला उपांत्यपूर्व फेरीत बहरीनच्या अलिबेग अलिबेगोव्हचे आव्हान असेल. बजरंगच्या श्रेणीत चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू आहेत. यामध्ये सध्याचा आशियाई विजेता आणि 2022चा जगज्जेता इराणचा रहमान अमौजद खलिलीचा समावेश आहे. तो आणि बजरंग उपांत्य फेरीत पोहोचले तर दोघेही आमनेसामने येऊ शकतात.

बजरंगप्रमाणेच दीपक पुनिया (86 किलो) यानेही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (2022) नंतर कोणतीही प्रभावी कामगिरी केलेली नाही. अमन सेहरावत 57 किलो गटात पदकाचा दावेदार असेल. गेल्या दोन वर्षांत त्याने आपल्या कौशल्यात लक्षणीय सुधारणा केली आहे. 23 वर्षांखालील जागतिक विजेता बनल्यानंतर त्याने वरिष्ठ स्तरावर आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Exit mobile version