| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेमध्ये महिला संघांसह पुरुष संघदेखील क्रिकेट सामने खेळणार आहेत. भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला आयसीसी टी-20 क्रमवारीच्या आधारे थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे. भारताचा उपांत्यपूर्व सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. तर महिला संघांचे सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होतील.
1 जूनपर्यंत आयसीसी टी-20 क्रमवारीत आशियातील अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. पुरुष क्रिकेट संघाचे सामने 28 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरदरम्यान खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 18 संघ पुरुषांचे आणि 14 महिला संघ सहभागी होणार आहेत. भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व सामना 5 ऑक्टोबर रोजी होईल, त्याच्या दुसऱ्याच दिवशी उपांत्य फेरीचा सामना होईल.
19 ते 26 सप्टेंबरदरम्यान महिला क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरला दोन सामन्यांच्या बंदीमुळे दोन्ही बाद फेरीचे सामने खेळता येणार नाहीत. 22 सप्टेंबर रोजी भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत भिडतील. जर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर हा सामना 25 सप्टेंबरला होईल. 26 सप्टेंबर रोजी सुवर्ण आणि कांस्यपदकांचे सामने होणार आहेत.