। पेण । प्रतिनिधी ।
ईद-उल-अजहा किंवा बलिदानाची ईद म्हणजेच बकरी ईद हा सण मुस्लिम बांधव जगभरात साजरा करीत असतात. या दिवशी कुरणामधील बळीची घटना साजरी केली जाते. ईस्लामी काल गणनेतील अखेरेच्या महिन्याच्या 10 व्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुरबानीचा उत्सव म्हणून या ईदीला विशेष महत्व आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदा एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे या सणाचा महत्व द्विगुणीत झाला आहे.
पेण येथील वरच्या मोहल्ल्यात सकाळी 8ः30 वाजता नमाज अदा करण्यात आली. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना गळा भेट घेत ईदीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर खालच्या खाटीक मोहल्ल्यात दोन वेळा नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर शांतता कमिटीच्या सदस्यांनी सर्व मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देऊ न त्यांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी डी.वाय. एस. पी. शिवाजी फडतडे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, अॅड. मंगेश नेने, नगरसेवक संतोष पाटील, एल.के.म्हात्रे, जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना पाटील, सदाशिव पवार, पायल सुर्वे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शांतता कमिटीचे सदस्य हजर होते.